राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न निश्चित झालं आहे. सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत माहिती दिली. सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे.
कोण आहे सुप्रिया सुळेंचा होणार जावई?
सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आहेत. ही नागपूरमधील कंपनी असून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. जलसिंचन, सांडपाण्यावर प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन यासारख्या प्रकल्प ही कंपनी हाताळते. सारंग यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे, असं त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर दिसत आहे. मागील 20 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून कंपनीने भारतातील 30 हून अधिक शहारंमध्ये प्रदीर्घ काळ काम केलं आहे. ग्रामीण पाणी समस्या, सिंचन व्यवस्थेबरोबरच देशातील अडीच हजार गावांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन हाताळलं आहे. ही कंपनी जगातील अव्वल 50 खासगी जल व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत 24 व्या स्थानी आहे. मालदीवमधील पाणी व्यवस्थापनाच्या कामासाठी भारतीय पंतप्रधानांकडून या कंपनीला सर्वोत्तम काम करणारी कंपनी म्हणून पुरस्कार मिळाल्याचं कंपनीसंदर्भात ‘लिंक्डइन’वर उपलब्ध माहितीमध्ये म्हटलं आहे.
रेवती सुळेंचा आतापर्यंतचा प्रवास: आईसाठी राजकीय प्रचार ते कंपनीची मालकीण
रेवती सुळे या 27 वर्षांच्या असून त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1998 रोजी बारामती येथे झाला आहे. त्यांनी मुंबईतील द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. रेवती यांचं महाविद्यालयीन शिक्षण ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’मधून घेतलं आहे. त्यांनी 2023 मध्ये मास्टर्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली. रेवतीने यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. मात्र त्या आपल्या आईच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असतात. 2024 मध्ये बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात भाग घेत रोड शो आणि मेळाव्यांचा सहभाग नोंदवलेला. ऑगस्ट 2025 मध्ये, रेवती यांनी वडील सदानंद सुळे यांच्यासोबत ‘स्नायपर स्पोर्ट्स’ नावाची एक स्पोर्ट्स कंपनी सुरू केली. भारतात तळागाळातील स्तरापर्यंत खेळांची आवड निर्माण करण्याचं या कंपनीचं उद्दीष्य आहे. ‘स्नायपर स्पोर्ट्स’ भारतातील व्यावसायिक बास्केटबॉल लीगच्या माध्यमातून सक्रीय आहे. त्या सोशल मीडियावर फार सक्रिय नाहीत.
पवार कुटुंबाच्या नात्यातील तिसरं लग्न
रेवती यांच्या पूर्वी काही महिन्यांआधीच जय पवार यांचा विवाह बहरीन देशात पार पडला. त्यानंतर जय यांचे चुलत बंधू युगेंद्र पवारांचं लग्नही मुंबईतील बीकेसी येथे मोठ्या थाटामाटात पार पडलं. या सर्व लग्नांमध्ये कुटुंबियांनी अगदी हिरहिरीने सहभाग नोंदवला. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वच सोहळ्यांना सर्व नातेवाईक उपस्थित होते. बहरीनमधील जय पवारांच्या लग्नात दिवंगत नेते अजित पवार आणि त्यांची बहीण सुप्रिया सुळेंनी केलेला डान्स चर्चेत होता.
