भिगवण-बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ६ ते ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैनकवाडी फाट्याजवळ प्रवाशांना अडवून मारहाण व लूटमार
फिर्यादी विश्वराजे चंद्रशेखर पाटील व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कॅरी गाडीतून प्रवास करत असताना, जैनकवाडी फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी अचानक गाडी अडवली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. या हल्ल्यात फिर्यादीची बॅग, मोबाईल फोन, चार्जिंग पॉवर बँक, एटीएम कार्ड व रोख रक्कम असा एकूण १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हल्लेखोरांनी लुटून नेला.
