सासूरवाडीला भेट देऊन रात्री घराकडे निघालेल्या जावयाच्या कारला ट्रकने धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची येळगाव-साखळीदरम्यान घटना पैनगंगा नदीच्या पुलाजवळ रविवारी रात्री घडली.
काय घडलं?
महेश कडुबा लोढे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे सासूरवाडीला भेट दिल्यानंतर महेश आपल्या गावी मेहकर तालुक्यातील मोहदरी येथे कारने (एमएच-२८-बीक्यू-२४१८) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जात होते. बुलढाणा ते चिखली मार्गावर साखळी फाट्याच्या अलीकडे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रकने (बीआर-०६-८४१२) कारला धडक दिली. या अपघातात महेश यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच बुलढाणा ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महेश यांचे काका केशव माधवराव लोढे यांच्या फिर्यादीवरून पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनीता खंडारे यांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.तर दुसऱ्या एका घटनेत, वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुलता आणि पुतण्याचा मृत्यू झाला.
हा अपघात शनिवारी मध्यरात्री उमरगा (जि. धाराशिव) बायपासवर झाला. पोलिसांनी सांगितले, की मूळज (ता. उमरगा) येथील रहिवासी बालाजी पांडुरंग बिराजदार (वय ४८) आणि पुतण्या कुणाल शिवाजी बिराजदार (वय २३) हे शनिवारी रात्री नातेवाईकांना सोडण्यासाठी उमरगा चौरस्ता येथे गेले होते. रात्री बाराच्या सुमारास ते दुचाकीवरुन गावी निघाले होते. उमरग्याजवळील कोरेगाव पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने मागून धडक दिली. धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळित झाली.
