पतीची खासगी नोकरी, सर्वसामान्य महिलेस संधी; पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या जयश्री सोनकांबळे लातूरच्या महापौर

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने (Congress) राज्यातील एकमेव महापालिक स्पष्ट बहुमतासह ताब्यात घेतली ती लातूरची (Latur). येथील महानगरपालिकेच्या महापौरपदी (Mayor) जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲड.स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही दावेदार नसल्याने या निवडी बिनविरोध ठरल्या असून,लवकरच हे दोघेही आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच नगरसेवक बनलेल्या जयश्री सोनकांबळेंना थेट महापौरपदाची लॉटरी लागली असून स्नेहल उटगे हेही पहिल्यांदाच नगरसेवक बनले आहेत. त्यात, जयश्री सोनकांबळे ह्या सर्वसामान्य कुटुंबातील भगिनीला काँग्रेसने महापौरपदाची संधी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. जयश्री यांचे पती खासगी नोकरी करतात, गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ता बनून कार्यरत आहेत.

लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे यांची निवड झाली असून, त्यांनी भाजपाच्या उमेदवार प्रियंका गायकवाड यांचा 153 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयासह लातूरच्या महापौरपदावर त्यांचे नाव कोरले गेले आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून अनुसूचित जाती (एस.सी.) महिला गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती. वय 46 वर्षे असलेल्या जयश्री सोनकांबळे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्या मागील 15 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून, सामाजिक कार्य आणि पक्ष संघटनात्मक कामातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, आणि पहिल्याच निवडणुकीत थेट विजय मिळवत त्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे त्यांचे राजकीय पदार्पण विशेष लक्षवेधी ठरले आहे. त्यांचे पती भालचंद्र सोनकांबळे हे खासगी नोकरीत कार्यरत असून, तेही मागील 20 ते 25 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावानपणे जोडलेले आहेत.

कुटुंबाची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीही त्यांच्या वाटचालीला बळ देणारी ठरली आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत महापौरपदापर्यंतचा जयश्री सोनकांबळे यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे. सामाजिक बांधिलकी, पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

पहिल्यांदाच नगरसेवक अन् उपमहापौर

लातूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची निवड झाली असून, पहिल्याच निवडणुकीत थेट उपमहापौरपद मिळवणारे ते शहरातील लक्षवेधी नेतृत्व ठरले आहेत. लिंगायत समाजातून येणारे स्नेहल उटगे यांचे कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावानपणे जोडलेले आहे. वय ४५ वर्षे असलेले स्नेहल उटगे हे एलएलबी शिक्षण पूर्ण केलेले असून मागील १८ वर्षांपासून वकिली व्यवसायात सक्रिय आहेत. न्यायालयीन कामकाजासोबतच सामाजिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. या निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली, मात्र अनुभवी प्रतिस्पर्ध्याला धक्का देत दणदणीत विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ८ (लातूरचा मुख्य गाव भाग) येथून त्यांनी भाजपाचे दोन टर्म नगरसेवक शैलेश स्वामी यांचा ९७० मतांनी पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. पहिल्याच वेळी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लगेचच उपमहापौरपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांचे राजकीय पदार्पण प्रभावी ठरले आहे. पक्षनिष्ठा, कायदेशीर अभ्यास आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी हे यश मिळवल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधील सभेतून दिवंगत नेते तथा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसून जातील, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात लातूरची निवडणूक गाजली. तसेच, येथील महापालिकेत कोणाची सत्ता येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, काँग्रेसने लातूरचा गड राखला असून 43 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

महापालिकेवर काँग्रेस–वंचित आघाडीचे स्पष्ट बहुमत

लातूर महानगरपालिकेतील १८ प्रभागांमधील एकूण ७० जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४३ जागांवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीला ४ जागा मिळाल्या असून, दोन्ही पक्ष मिळून ४७ जागांवर बहुमत मिळवत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्षाला २२ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ एका जागेवर विजयी झाले होते .

निवडी नंतर काँग्रेसचा जल्लोष

महापौर आणि उपमहापौरपदासाठी जयश्री सोनकांबळे आणि ॲड. स्नेहल उटगे यांचीच नावे समोर येताच या निवडी औपचारिक ठरल्या. चित्र स्पष्ट होताच लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

नवनिर्वाचित नेतृत्वाची प्रतिक्रिया

नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी शहरातील महिला सुरक्षितता, स्वच्छता व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणांचा विस्तार ही कामे प्राधान्याने राबवली जातील, अशी माहिती दिली. तर, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे सांगितले. “पाणी उपलब्ध असूनही उशिरा पुरवठा होतो. पाणीपुरवठ्याचे सुसूत्रीकरण करून लातूरकरांना नियमित आणि मुबलक पाणी देण्यासाठी ठोस रोडमॅप तयार केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *