‘मेहता यांनी मराठीतून शपथ घेतली नाही तर…’; मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरांना कडाडून विरोध

मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरांवरुन वातावरण तापलं आहे. मराठी एकीकरण समितीने अमराठी महापौरांविरोधात एल्गार पुकारला असून मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहतांची वर्णी लागली असल्यानं इथं अमराठी महापौर होऊ देणार नाही असा इशारा देणाऱ्या एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतल्याचं आता पाहायला मिळत आहे.

एकीकरण समितीने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात हे आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. मीरा भाईंदरमधील या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तर आयोजकांना मनाई आदेशाची नोटीसही बजावण्यात आलीय. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मीरा भाईंदर मध्ये मराठी अमराठी वाद असताना महापौर पदावरून चांगलाच राजकीय घमासान होणार असं चित्र पाहायला मिळत आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या भाजपच्या महापौर डिंपल मेहता यांनी जर मराठीतून महापौर पदाची शपथ घेतली नाही तर नरेंद्र मेहतांच्या भाजप कार्यालयात शिरून आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप राणे यांनी दिला आहे. मिरा भाईंदर मध्ये भाजपचे अनेक मराठी नगरसेवक असताना त्यांना महापौर पदाची संधी दिलेली नसल्याने भाजपचे अनेक नगरसेवक नाराज असून मेहता घराणेशाही चालवत असल्याचे राणे म्हणाले आहेत.

वादाची पार्श्वभूमी काय? 

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपकडून मराठी उमेदवार देण्यात आला नसल्यानं त्या निषेधार्थ मंगळवारी (ता. ३) मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल होता. ‘मिरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा’ अशी ठाम भूमिका मराठी एकीकरण समिती आणि मनसेने घेतली. भाजपने मिरा भाईंदरमध्ये माजी महापौर डिंपल मेहता यांना उमेदवारी देत, भाजपने मराठी उमेदवार न दिल्याच्या निषेधार्थ मराठी एकीकरण समितीनं हे आंदोलन पुकारलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *