भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत; श्वानदंशानंतर 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, एकूण श्वानदंशांची संख्या हादरवणारी

भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्वानदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळजनक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्याच्या चाव्याने 12 वर्षीय मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे केवळ संबंधित कुटुंबच नव्हे तर संपूर्ण शहर हादरले असून, भिवंडीतील आरोग्य व्यवस्था आणि महापालिकेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वाढत्या श्वानदंशाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

श्वानदंशाची धक्कादायक घटना
भिवंडीतील ईदगाह परिसरात 10 जानेवारी रोजी घराबाहेर खेळत असलेल्या हमीद सद्दाम खान या मुलावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेजवळ चावा घेतला. गंभीर जखमी झालेल्या हमीदला तात्काळ स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि वेळोवेळी तपासणी सुरू होती.

काही दिवसांनंतर त्याची प्रकृती पुन्हा बिघडू लागल्याने 28 जानेवारी रोजी पालकांनी त्याला पुन्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथून कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि 31 जानेवारी रोजी उपचार सुरू असतानाच हमीदचा मृत्यू झाला.

भिवंडीतील वाढती भीती आणि आकडेवारी
या घटनेनंतर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मागील वर्षभरात सुमारे 11037 नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. केवळ जानेवारी महिन्यातच 1062 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे आकडे चिंताजनक आहेत.

पालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र तब्बल 12 वर्षे बंद होते. मागील वर्षी ते सुरू करण्यात आले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम अजून दिसून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार रईस शेख यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशावरील अँटी रेबीज लस वेळेवर न मिळाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप त्यांनी केला. ही बाब अत्यंत गंभीर असून यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर भिवंडीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिक तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *