पहाटे 1 वाजता गच्चीवर गेला, सकाळी कॅम्पसमध्ये बॉडी; मुंबईत IITच्या विद्यार्थ्यानं का उचललं टोकाचं पाऊल?

मुंबईत आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. IIT Bombay मध्ये शिकणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचललं आहे. हॉस्टेल 4 च्या गच्चीवरून उडी मारून विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पवई येथील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारल्यानंतर 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये घडली असून, नमन अग्रवाल यांनी वसतिगृहाच्या टेरेसवरून उडी मारली. नमन हा दुसऱ्या वर्षाचे B-Tech अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तो राजस्थानमधील पिलाणी येथील रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, तो आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक 4 मध्ये राहत होता.

कशामुळे उचललं टोकाचं पाऊल?

स्थानिक पवई पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नमनच्या खोलीत किंवा घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नसल्यामुळे आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पवई पोलिस या संबंधात तपास करत आहेत. या घटनेबाबत आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.गेल्या काही वर्षांत समुपदेशन केंद्रे आणि विद्यार्थ्यांसाठी सहाय्य व्यवस्था उभारण्यात आल्या असतानाही, आयआयटींसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत असल्याचे दिसून येते.

5 वर्षांत 35 घटना

उपलब्ध सरकारी आणि संस्थात्मक आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत विविध आयआयटींमध्ये 35 हून अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. जानेवारीमध्ये IIT Kanpur मधील एका 25 वर्षीय पदवीधार विद्यार्थ्याने कॅम्पसमधील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं. रामस्वरूप इश्राम असे या व्यक्तीचं नाव असून, तो कॅम्पसमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून काम करत होता. तो त्याच्या पत्नी आणि तीन वर्षीय मुलीसह तेथे राहत होता. सध्या पोलिस या संदर्भात तपास करत असून, वसतीगृहातील रहिवासी, त्याचे मित्र आणि इतर शिक्षकांशी बोलून घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *