प्रशांत जगताप यांची फेसबुक पोस्ट
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांची साथ देणारे, मात्र पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा ‘हात’ धरणारे नेते प्रशांत जगताप यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “महाराष्ट्राचे लाडके “दादा” आदरणीय अजितदादा पवार यांचे निधन हा माझ्यासह तमाम महाराष्ट्राला बसलेला धक्का आहे. दोनच दिवसांपूर्वी दादांच्या अंत्यविधीला मी उपस्थित होतो, परंतु आज दादा आपल्यात नाही ही बाब मान्य करण्यास मन अजूनही धजावत नाही, म्हणूनच आज पुन्हा एकदा ज्याठिकाणी दादांना मुखाग्नी देण्यात आला त्याठिकाणी नतमस्तक होत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दादांच्या असंख्य आठवणी मनात दाटून आल्या.” असं प्रशांत जगताप यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
वैयक्तिक जीवनात पोकळी
१० जून १९९९ ते १ जुलै २०२३… तब्बल २४ वर्षे मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय राहिलो. या संपूर्ण काळात दादांचं मार्गदर्शन आणि पाठबळ मला मिळालं. विचारांवरील माझी निष्ठा, जनतेच्या हितासाठी असलेली माझी तळमळ पाहून दादांनी मला पक्ष संघटनेत, महानगरपालिकेत महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली. आयुष्यातील अडचणीच्या काळात ज्यांनी नेहमीच माझ्या पाठीवर हात ठेवला असे दादा आज आपल्यात नाहीत. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिघात व माझ्या वैयक्तिक जीवनातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं प्रशांत जगताप यांनी लिहिलं आहे.
दादांनी आपला माणूस मानला
२ जुलै २०२३ रोजी दादांनी वेगळी राजकीय वाट निवडली, त्यावेळी मी पुरोगामी विचारांवर निष्ठा ठेवून भाजपाला साथ न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जवळपास ३ वर्षांच्या काळात मी स्वतः कधीही अजितदादांच्या बाबतीत मनात आकस ठेवला नाही. प्रशांत जगतापला आपण संधी दिली आणि प्रशांत जगताप आता आपल्या सोबत नाही म्हणून आदरणीय अजितदादांनीही कधीच मनात आकस ठेवला नाही, कुठेही याबद्दल वक्तव्य केलं नाही. २४ वर्षांच्या वाटचालीत आमच्यात निर्माण झालेल्या नात्याचा हा परिपाक होता. अजितदादांच्या मनाचा हा मोठेपणा आयुष्याच्या अखेरपर्यंत माझ्या स्मरणात असेल. आजपर्यंतच्या वाटचालीत अजितदादांसोबत माझे शेकडो फोन कॉल झाले असतील, अनेक वेळा त्यांच्या कार्यालयात, निवासस्थानी, पक्ष कार्यालयात बैठका झाल्या असतील, प्रत्येक वेळी दादांनी मला “आपला माणूस” म्हणून सन्मानाची वागणूक दिली हे मी माझे भाग्य समजतो, असं प्रशांत जगताप म्हणतात.
हळवी आठवण सांगितली
अजितदादांसोबतची एक हळवी आठवण सांगताना, प्रशांत जगताप म्हणतात, की “एखादा नेता आपल्या कार्यकर्त्यावर किती जीवापाड प्रेम करू शकतो याचा मूर्तीमंत उदाहरण होते “अजितदादा”… जून २०२२ मध्ये माझा चेहरा पॅरालाईज झाला, तेव्हा जवळपास १५ दिवस मी ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली, १५ दिवस मी चेहऱ्याला मास्क आणि गॉगल लावूनच होतो. अखेर मोठ्या धैर्याने मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही बाब जगासमोर मांडली. सायंकाळी ७ वाजता मी हे फेसबुक लाईव्ह केलं आणि रात्री ११.३० वाजता मला आदरणीय अजितदादांचा देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून कॉल आला.”
