राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या प्रशासकीय जबाबदारीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री तर होतेच शिवाय त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खातीही होती. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण? याबद्दल जोरदार चर्चा सुरु असतानाच इकडे प्रशासकीय कामांमध्येही अजित पवारांकडील खाती कोणाकडे जाणार याबद्दलची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. असं असतानाच या खात्यांसदर्भात भाजपाने सावध पवित्रा घेतल्याचं पाहयला मिळत आहे.
भाजपाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही राज्यातील सत्तेतमध्ये वाटेकरी असून तिसरी पक्ष म्हणून त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती आहेत. राज्याच्या तिजोरीची चावी म्हणजेच अर्थ खातं हे अजित पवारांकडे होतं. त्याचबरोबर वित्त नियोजन, उत्पादन शुल्क, क्रीडा ही सारी खाती अजित पवार पाहत होते. आता अजित पवारांनंतर ही खाती कोणाकडे जाणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु असतानाच भाजपाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप ठेवणार नियंत्रण
अर्थ, वित्त नियोजन, उत्पादन शुल्क, क्रीडा ही खाती राष्ट्रवादीकडेच राहणार आहेत असं सांगण्यात आलं आहे. मात्र, या खात्याचा नवा मंत्री कोण? हे राष्ट्रवादीकडून ठरेपर्यंत भाजप त्यावर नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजेच अर्थ खातं सध्या तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अख्त्यारित घेण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
सुनेत्रा पवार शपथ घेणार शरद पवारांना कल्पनाच नाही
अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन झाल्यानंतर रात्री उशीरा सुनेत्रा पवार त्यांच्या दोन्ही मुलांसहीत रस्ते मार्गाने मुंबईला रावाना झाल्या. रात्रभर प्रवास करुन पहाटे त्या मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी पोहोचले. एकीकडे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तयारी सुरु असतानाच शरद पवारांना बारामतीमध्ये पत्रकारांनी यासंदर्भात विचारलं असता, “सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे,” असं म्हटलं आहे. “प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असून तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावं हे ठरवलं. त्यावर भाष्य करणार नाही,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
एवढ्यावरच न थांबताना, “सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल मला माहितीच नाही. सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच शरद पवारांसोबत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
