राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीमंत कुटुंब आणि राजेशाही सुखसोयी सोडून अध्यात्माचा मार्ग स्विकारणाऱ्या 25 वर्षीय साध्वी प्रेम बैसा यांचा आश्रमातच संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. जोधपूर आश्रमात तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रेम बैसा यांना चुकीचे इंजेक्शन देण्यात आल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.
कोण आहे साध्वी प्रेम बैसा?
साध्वी प्रेम बैसा राठोड (राजपूत) कुटुंबातील होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव देवी सिंह राठोड होते. त्यांचा जन्म जोधपूर जिल्ह्यातील छोटी धनारी गावात झाला, ज्याचे नाव आता कृष्णा नगर असे ठेवण्यात आले आहे. त्यांनी जोधपूरच्या बोरानाडा भागात “साधना कुटीर” आश्रम चालवला. लहानपणापासूनच त्यांना भौतिक सुखसोयींपेक्षा भक्ती आणि आध्यात्मिक सहवासाची जास्त आवड होती. त्यांच्या वयाच्या इतर मुली करिअर आणि सांसारिक स्वप्नांमध्ये बुडालेल्या असताना, प्रेम बैस कृष्ण भक्तीगीतांमध्ये मग्न राहिल्या.साध्वी प्रेम बैसा यांनी अगदी लहान वयातच त्यागाचा मार्ग निवडला. सनातन धर्मावरील त्यांच्या सुमधुर स्तोत्रांमुळे आणि प्रभावी प्रवचनांमुळे त्यांना पश्चिम राजस्थानमध्ये “आधुनिक मीरा” म्हणून प्रसिद्धी मिळाली. सोशल मिडियावर त्या लोकप्रिय होत्या. त्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.
साध्वी प्रेम बैसा यांचा मृत्यू कसा झाला?
साध्वी प्रेम बैसा यांचे 28 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी जोधपूर येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे म्हटले जात आहे की त्या आजारी होत्या आणि इंजेक्शन देण्यासाठी एका कंपाउंडरला आश्रमात बोलावण्यात आले होते. इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे चार तासांनी, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट आली, जी एक सुसाईड नोट असल्याचे मानले जाते. त्यामध्ये त्यांनी “अग्निपरीक्षा” आणि “न्याय” बद्दल बोलले आणि जगाचा निरोप घेतला. साध्वी प्रेम बैसा यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या समर्थकांनी जोधपूरमध्ये मोठा गोंधळ घातला. खासदार हनुमान बेनीवाल यांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी कंपाउंडरला अटक केली आहे आणि मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
