मुंबईला लागून असलेल्या ठाणे महानगरपालिकेचे महापौरपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाण्याचे महापौर आणि उपमहापौर कोण होणार याच्या नावाची घोषणा झाली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेसोबत वाद घालत टोकाची भूमिका घेणाऱ्या भाजपने निर्णय बदलला आहे. महापौर पद शिवसेनेकडे उपमहापौर भाजपकडे असणार आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभाग 20 जिंकणाऱ्या शर्मिला पिंपोलकर यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शर्मिला या शिवसेना नेते रोहित पिंपोलकर यांच्या पत्नी आहेत. कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 75 जागा जिंकल्या, तर भाजपने 28 जागा जिंकल्या. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 9 जागा जिंकल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 12 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 1 जागा जिंकली. याशिवाय, असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने, एआयएमआयएमने 5 जागा जिंकल्या आणि एका अपक्षाने 1 जागा जिंकली. ठाणे महानगरपालिकेत एकूण 131 जागा आहेत. ठाणे महानगरपालिकेत एकूण वॉर्डांची संख्या 33 आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या देखील बैठक पार पडली. ही बैठक मुख्यतः ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर नवी मुंबई या महानगरपालिकांसाठी होती. याच बैठकीनंतर भाजपचा विरोधी पक्षात बसण्याचा सूर मावळला अशी सूत्रांची माहिती आहे. ठाण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पद ठरल्यानंतर कोणत्या समित्यांवर कोणत्या पक्षाचे नगरसेवक बसतील यासंदर्भात देखील फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र हा काय फॉर्मुला असेल ते अजूनही गुलदस्तात आहे.
