मुंबईत परदेशी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेतून आलेल्या एका महिलेची टॅक्सी चालकाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवघ्या काहीशे मीटरच्या प्रवासासाठी तब्बल 18 हजार रुपये आकारण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव देशराज यादव (वय ५०) असून तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात टॅक्सी चालवत होता. १२ जानेवारी रोजी ही घटना घडली. अमेरिका येथून मुंबईत आलेली अर्जेंटिना एरियानो ही महिला विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीमध्ये बसली होती. तिच्याकडून टॅक्सी चालकाने 400 मीटरच्या मार्गसाठी त्याने 18000 रुपयांचे भाडे घेतले.
पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीमध्ये बसल्यानंतर प्रत्यक्षात हॉटेल विमानतळापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असतानाही चालकाने तिला थेट तेथे न नेता अंधेरी पूर्व भागात जवळपास २० मिनिटे फिरवले. यानंतर पुन्हा त्याच परिसरात परत आणून तिला हॉटेलसमोर सोडण्यात आले आणि प्रवासाच्या नावाखाली तब्बल १८ हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले. या प्रचंड भाड्यामुळे महिला हादरून गेली होती.
सोशल मीडियामुळे प्रकरण उघडकीस
या घटनेनंतर जवळपास दोन आठवड्यांनी, 26 जानेवारी रोजी पीडित महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपला अनुभव शेअर केला. तिने त्या दिवशीच एक व्हिडीओ पोस्ट केला होता, जो काही तासांतच व्हायरल झाला. या पोस्टला लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. विशेष म्हणजे, तिने टॅक्सीचा नोंदणी क्रमांकही सार्वजनिक केला होता, ज्यामुळे पोलिसांना तपास सुरू करणे शक्य झाले.
अवघ्या तीन तासात आरोपी अटकेत
पीडितेशी थेट संपर्क साधता न आल्याने सहार पोलिसांनी 27 जानेवारी रोजी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला. नोंदणी क्रमांकाच्या आधारे तपास करत पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपी चालकाला अटक केली.
हॉटेलमधून माहिती
तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित हॉटेलशी संपर्क साधून माहिती घेतली. महिलेने 12 जानेवारी रोजी हॉटेलमध्ये चेक-इन केले होते आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला रवाना झाली होती. त्यानंतर ती अमेरिकेत परतली. या घटनेची माहिती तिने हॉटेल प्रशासनाला दिली नव्हती, असेही समोर आले आहे. पोलिस आता तिचा अधिकृत जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांच्या तपासात या फसवणुकीत आरोपीचा एक सहकारी सहभागी असल्याचे संकेत मिळाले असून त्याचा शोध सुरू आहे. देशराज यादव सध्या पोलिस कोठडीत असून त्याची टॅक्सी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय, आरोपीचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठी परिवहन विभागालाही माहिती पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
