लग्न ठरवताना सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं आपण अनेकदा ऐकतो. गावाकडेही सोयरीक जुळवताना सगळ्या गोष्टींची शहानिशा करुन घ्यावी असं सांगितलं जातं. मात्र लग्न ठरवताना मुलाकडून किंवा मुलीच्या घरच्यांकडूनच एखादी गोष्ट जाणूनबुजून लपवण्यात आली तर? असे अनेक प्रकार आपण यापूर्वी ऐकले असतील किंवा त्याबद्दल वाचलंही असेल. मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगरमध्ये घडलेल्या एका विचित्र प्रकरणामध्ये मुलाच्या घरच्यांनी लपवून ठेवलेलं त्याच्या लैंगिकतेसंदर्भातील सत्य समोर आल्यानंतर सूनेलाच मारहाण करण्यात आली आहे. हे प्रकरण आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं असून या प्रकरणाची पंचक्रोषीत चर्चा असल्याचं दिसत आहे.
तिनेच कंटाळून पोलीस स्टेशनमध्ये घेतील धाव
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचं नपुंसकत्व लपवून लग्न लावल्याचा आणि त्यानंतर पैशांसाठी विवाहितेचा छळ केल्याचा हा प्रकार छत्रपती संभाजी नगरात समोर आला आहे. सदर प्रकरणामधील पीडिता 32 वर्षांची आहे. सासरच्या मंडळींने फसवणूक केल्यानंतर अत्याचार सुरु केल्याने या पीडित विवाहितेने छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीसह सासरच्या दहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने डॉक्टरांकडे जाण्याची मागणी केल्यानंतर पतीकडून मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी मागितले 15 लाख
सासरच्या मंडळींना पतीच्या नपुंसकत्वाची माहिती असूनही पीडितेला गप्प राहण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे. आपल्या मुलातील दोष लपवून फसवून मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर तिच्याकडे हुंडाही मागण्यात आल्याचं आरोपामध्ये म्हटलं आहे. नाशिक येथे फ्लॅट खरेदीसाठी 15 लाख रुपयांची मागणी पीडितेकडे करण्यात आली. पैसे देण्यासाठी सारच्या मंडळींकडून तिच्यावर वारंवार दबावही टाकण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नपुंसकत्व म्हणजे काय?
नपुंसकत्व हे भारतीय समाजामध्ये फारश्या न बोलल्या जाणाऱ्या लैंगिक समस्यांपैकी एक आहे. नपुंसकत्व ही वैद्यकीय समस्या आहे. ही अडचण असलेल्या पुरुषांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पुरेशी उत्तेजना मिळत नाही. किंवा ते पुरेसे उत्तेजित होऊ शकत नाही किंवा ते उत्तेजन टिकवता येत नाही. अशा व्यक्तींना शरीरसंबंध ठेवताना अडचण येते. या साऱ्यालाच मराठीत ‘नपुंसकता’ किंवा ‘लैंगिक अक्षमता’ असेही म्हणतात.
अशाप्रकारे मुलींची किंवा तिच्या घरच्यांची फसवणूक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशा घटना प्रकाशझोतात आलेल्या आहेत.
