बदलापूर शहरात पुन्हा एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. याआधी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी Badlapur Crime प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर केला होता. त्यानंतर आता पुन्हा अशी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. बदलापुरात 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्कूलव्हॅन चालकाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चिमुकलीची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.
व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड
बदलापूर पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTOने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
