तालुक्यातील वानेगाव येथे ३१ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सासरच्या मंडळींनी मारहाण करून तिला विहिरीत फेकल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला. नातेवाइकांनी केलेल्या आरोपांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मृत विवाहितेच्या नातेवाइकांनी फुलंब्री पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून साडेचार तास ठिय्या आंदोलन केले. अखेर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता वानेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
सुनीता अण्णा भोकरे (वय ३१, रा. वानेगाव, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिवाजी गवळी यांची ती मुलगी असून, बारा वर्षांपूर्वी तिचा विवाह वानेगाव येथील अण्णा भोकरे यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. मंगळवारी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास सुनीता घराबाहेर पडली, मात्र, ती परत न आल्याने सायंकाळपासून तिचा शोध घेण्यात आला. बुधवारी सकाळी गावाजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळला.
पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ‘आरोपींना अटक करा व खुनाचा गुन्हा दाखल करा,’ अशी जोरदार मागणी नातेवाइकांनी केली. पोलिस निरीक्षक संजय सहाणे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दंगा काबू पथक तैनात करण्यात आले.
