देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांचा परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसत असून काही भागांमध्ये थंडी कमी झाली आहे, तर कुठं तापमान अद्यापही एकेरी आकड्यावरच आहे. मागील 48 तासांपासूनच्या ढगाळ वातावरणामुळं किनारपट्टी भागांमध्ये थंडीचं प्रमाण कमी झाल्यानं तापमानात चढ- उतारही पाहायला मिळत आहे.
पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं घाट क्षेत्रांमध्ये धुकं, दवबिंदू असं चित्र आणि बोचरी थंडी जाणवेल. काही भागांमध्ये मात्र आकाश अंशत: ढगाळ असल्यानं दमटपणा जाणवेल. समुद्रात वाऱ्याची बदललेली दिशा आणि कमी दाबाचा पट्टा, हलक्या पावसाच्या सरी यांमुळं हवेतील वाढलेला ओलावा आता कमी होत असून, मुंबईतील हवासुद्धा कोरडी झाली आहे. या बदलामुळे तापमानात किंचित घसरण झाली असून, हवेत गारवा वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस हा गारवा टिकून राहणार असल्याने मुंबईकरांना थंडीचा आनंद घेता येईल. ही थंडी 15 जानेवारीपर्यंत तग धरून राहू शकते. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम वाढणार आहे. तर, उर्वरित राज्यामध्ये हवेत हलका गारवा जाणवणार आहे.
तापमान अंश सेल्सिअसमध्ये… (किमान सरासरी)
मुंबई- 16.5
पालघर – 15.5
जळगाव- 15.7
जेऊर – 15.9
पराभणी – 11.2
सांगली- 13.9
पुढील चार ते पाच दिवसांदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीहून कमी तापमान असेल. नंतर त्यात वाढ होईल. तर, राज्यात पुढचे चार आठवडे हवामान कोरडं राहणार असून, हलका गारवा असेल अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
देशाला वादळी पावसाचा धोका?
IMD च्या माहितीनुसार दक्षिण पश्चिमेस असणाऱ्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असून, त्यामुळं पुढील 48 तासांत अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा काही भाग इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इसारा देण्यात आला आहे. 11 जानेवारीलाही पावसाचा इशारा असल्यानं मासेमारांना सागरी हद्दीत न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात एकिकडे थंडी आणि धुक्याचा कहर असतानाच देशात बंगालच्या उपसागरेवरील वाऱ्यांच्या बदलांचा थेट परिणाम प्रामुख्यानं दक्षिण भारतावर दिसून येणार आहे. तर, उत्तर आणि मध्य भारत मात्र थंडीच्या लाटेत सामावून जाणार आहे. पंजाब, हरियाणआ, बिहार आणि मध्य प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट सक्रिय असेल. तर, काश्मीरच्या खोऱ्यात ही थंडी आणखी तीव्र होणार असून, त्यामुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असा इशारा देण्यात आला आहे.
