मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महापालिका निवडणुकांच्या पूर्वीच दोन महिन्यांचा हप्ता मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडून नुकतंच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका आणि यंदाच्या बीएमसी निवडणूक भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. घोसाळकरांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच प्रत्येकी दीड हजार असे एकूण ३००० रुपये येत्या १४ जानेवारीपूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे.
“सण उत्साहाचा, क्षण मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच ३००० रुपये, १४ जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत!” असे तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिले आहे.
“सण-उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम ‘देवाभाऊ’ आणि महायुती सरकारने केले आहे.” असेही घोसाळकर यांनी लिहिले आहे. तेजस्वी अभिषेक घोसाळकर या दहिसर वॉर्ड क्रमांक २ येथून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महायुतीच्या उमेदवार आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेवर शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त
दुसरीकडे, पुणे महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात स्वबळावर उतरलेल्या शिवसेनेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही कल्याणकारी योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत शिवसेना उमेदवारांचे संपूर्ण पॅनेल असलेल्या पंधरा प्रभागांमध्ये आठ महिला संघटक लाभार्थी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधणार आहेत. अशा दीडशेहून अधिक संवाद कार्यक्रमांमधून सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना प्रत्येक घराघरात पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
विधानसभा आणि नगरपालिका-नगर परिषदांच्या निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे ओळखून शिवसेनेने ‘लाडकी बहीण’ योजनेवर प्रचाराची भिस्त ठेवली आहे. ‘शहरातील सर्व प्रभागांमध्ये आठ महिला संघटिका छोट्या-छोट्या गटांमध्ये लाभार्थी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधणार आहेत,’ असे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
