पत्नीच्या विरहातून पतीने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मनाला चटका लावणारी ही धक्कादायक घटना किनवट तालुक्यातील सारखणी येथील दहेली गावात काल मंगळवारी उघडकीस आली. काही महिन्यांपासून मयताची पत्नी ही एकटी माहेरी राहत होती. नांदायला येत नसल्यानं पतीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. विक्रम सुरेश मारशेटवार (वय 30) आणि शिवाजी विक्रम मारशेटवार (वय 2 वर्ष) असं मयत पिता-पुत्राचं नाव आहे. दरम्यान, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
पोटच्या लेकरासह विहिरीत उडी…
विक्रम मारशेटवार हे आपल्या कुटुंबासोबत दहेली येथे राहत होते. काही महिन्यांपासून त्याची पत्नी दोन वर्षाच्या मुलाला सोडून एकटी माहेरी राहत होती. परत येण्यासाठी विक्रम याने अनेकवेळा तिला सांगितलं, परंतु ती काही नांदायला आलीच नाही. त्यामुळे पत्नीच्या विरहात विक्रमने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन सोमवारी दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी गावातील राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन स्वत:सह चिमुकल्याचं जीवन संपविले. काल मंगळवारी सकाळी बाप-लेकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना गावातील काही लोकांना निदर्शनास आले.
पत्नीच्या विरहात पतीचं टोकाचं पाऊल
सकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंदखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतांचे शवविच्छेदन दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत विक्रम मारशेटवार यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष कोंडापेल्लीवार तपास करीत आहेत. पत्नीच्या विरहात पतीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे
