मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत राज्यात सुरू असलेल्या पर्वतीय बोगद्यातील कामाचा महत्त्वाचा टप्पा (ब्रेक थ्रू) शुक्रवारी पूर्ण झाला. हा टप्पा प्रकल्पातील तांत्रिक आव्हानांपैकी एक होता. राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पातील ही मोठी कामगिरी असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी जाहीर केले.
सप्टेंबर 2025 मध्ये ठाणे ते वांद्रे-कुर्ला संकुलदरम्यानचा सुमारे पाच किमी लांबीचा पहिला भूमिगत बोगदा पूर्ण झाला होता. या बोगद्याच्या मदतीने मुख्य बोगद्यापर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आहे.
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी बोगदे खोदणार
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील पर्वतीय बोगद्यातील कामाचा टप्पा हा राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल मानले जात आहे. बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यात बोगदे खोदण्यात येणार आहेत. यातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्यांमध्ये पर्वतीय बोगदा-पाच (एमटी-पाच) याचा समावेश आहे. विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान हा बोगदा आहे. याची लांबी सुमारे 1.5 किलोमीटर आहे.
