तू धुणी-भांडी कर, रिक्षा आम्हीच चालवणार, गुंडांनी महिलेची रिक्षा फोडली

तू धुणी-भांडी कर, रिक्षा आम्हीच चालवणार, गुंडांनी महिलेची रिक्षा फोडली

महिला वैमानिकांना फायटर जेट उडवण्याची परवानगी मिळत असल्यामुळे देशात जल्लोष केला जात आहे. मात्र त्याचवेळी राज्याची उपराजधानी नागपुरात, एका दलित महिलेला उदरनिर्वाहासाठी ऑटो चालवण्यापासून, गुंड रिक्षाचालकांची टोळी मज्जाव करत आहे. पतीच्या आजारपणामुळे रिक्षा चालवणाऱ्या बबिता रामटेके यांची रिक्षा पुरुषी मानसिकतेच्या गुंडानी फोडली आहे.

ऑटो चालवणे हे स्त्रियांचे काम नाही. त्याऐवजी उदरनिर्वाहसाठी भांडी घास अशा विकृत पुरुषी मानसिकतेच्या गुंडांनी या महिलेच्या ऑटोची तोडफोड करून व्यवसाय बंद पाडला. हा प्रकार तीनवेळा झाला. याबाबतची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत केली. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींविरुद्ध काहीही कारवाई केली नाही.

उदरनिर्वाहासाठी रिक्षा

43 वर्षांच्या बबिता रामटेके काही दिवसांपूर्वीपर्यंत मेहनतीने रिक्षा चालवून अर्धांगवायू झालेल्या पतीचा औषधोपचार आणि 4 सदस्यीय कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, 7 ऑक्टोबर रोजी काही गुंड ऑटो चालकांनी त्यांचा रिक्षा व्यवसाय बंद पाडला.

रिक्षा चालवणे हे स्त्रियांचे काम नाही. ते फक्त पुरुषांचे क्षेत्र आहे, असे या गुंडांचे म्हणणे आहे. घर चालवायचे असल्यास धुनी-भांडी कर असा सल्लाही या गुंडांनी महिलेला दिला.

धमकीला भीक नाही

मात्र कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी बबिता यांनी गुंड रिक्षाचालकांच्या मागणीला कोणतीही भीक घातली नाही. त्यांनी रिक्षा चालवणे सुरूच ठेवलं. त्यामुळे चिडलेल्या गुंड पुरुष रिक्षाचालकांनी त्यांना शिवीगाळ करत, थेट त्यांच्या रिक्षाची तोडफोड केली.

बबिता रामटेके या बीए द्वितीय वर्षापर्यंत शिकल्या आहेत. कुटुंब चालवण्यासाठी स्वाभिमानाने रिक्षा चालवून संसार उभारल्यास बिघडलं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र पुरुषी मानसिकता डोक्यात गेलेले गुंड त्यांना त्रास देत आहेत.

बबिताच्या संघर्षाची कहाणी फक्त या एका घटनेपुरती मर्यादित नाही. तर याआधीही पुरुष ऑटो चालकांच्या त्याच टोळीने त्यांच्यावर २ वेळा हल्ला केला होता. १० फेब्रुवारी रोजी पुरुष ऑटो चालकांच्या याच टोळीने बबिता यांना ऑटो चालवणे बंद कर, नाही तर जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्याची लेखी तक्रार बबिता यांनी अजनी पोलिस स्थानकात दिली होती. मात्र, पोलिसांनी तेव्हा गुन्हा नोंदविलाच नव्हता.

पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

या प्रकारानंतर बबिता यांनी तो परिसर सोडून, दुसऱ्या परिसरात रिक्षा चालवणे सुरू केलं. मात्र हीच गुंडांची टोळी तिथेही पोहोचली. 17 ऑगस्ट रोजी तर एका ऑटो चालकाने बबिता यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप बबिता यांनी केला. मात्र, थोडक्यात बचावलेल्या बबिता यांनी पेट्रोलने भिजलेलं अंग घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठलं. मात्र अजनी पोलिसांनी तेव्हाही तक्रार नोंदवण्याचं धाडस दाखवलं नाही.

पोलिसांचं स्पष्टीकरण

दुसरीकडे बबिता यांची तक्रार आली होती, मात्र तपासात तथ्य आढळले नसल्याने गुन्हा नोंदवला नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *