विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर आता निवडणूक आयोगानंही या आरोपांची दखल घेतली आहे. राज्यात सध्या मनपा निवडणुकीच्या धर्तीवर सुरू असणाऱ्या या राजकीय नाट्यावर शिवसेना UBT पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवार, 2 डिसेंबर 2025 रोजी काही परखड मतं मांडली. माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी नार्वेकरांचं नाव घेत काही गोष्टी उघडकीस आणत थेट सवालही केले.
DCM शिंदेंच्या घराबाहेर अधिकाऱ्यांच्या गाड्यांची रांग…
DCM शिंदेंच्या घराबाहेर अधिकाऱ्यांच्या गाड्यांची रांग लागत असल्याचं सांगताना राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात आचारसंहिता लागू आहे पण, ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या लागत आहेत. त्यात आरओ होते, कशाकरता? आचारसंहिता आहे ना? अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही तर ते कोणत्या अधिकारानं उमेदवारांना सांगताय आचारसंहिता पाळली पाहिजे? या सगळ्या RO चे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजेत आयोगानं. त्यांना कोणत्या मंत्र्यांचे, डीसीएमचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज बाद केले? उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी या आरओंच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे’.
‘राहुल नार्वेकरांचा विषय अतिशय गंभीर’
विरोधी पक्षातील उमेदवारांना नार्वेकरांनी धमकावण्याच्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना हे अतिश. गंभीर प्रकरण असल्याचं म्हणत राऊतांनी, ‘राहुल नार्वेकरांचा विषय अतिशय गंभीर आहे, जरी त्यांनी उत्तर वगैरे दिलं म्हटलं, ते काय उत्तर देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झाला होता आम्हाला माहितीये’ असं स्पष्ट केलं. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेचा उल्लेख करत ते म्हणाले, ’30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज काढा. माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांचं फुटेज कसं गायब होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कटकारस्थानात सहभागी झाले आहेत का?’.
नार्वेकरांवरील आरोपांप्रकरणी आयोगानंही चौकशी सुरू केली आहे, विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या, सीसीटीव्ही फुटेज गायब केलं… ही यंत्रणा यांची? असा खोचक टोला लगावत राऊतांनी मनपा आयुक्तांनी याचं उतत्तर दिलं पाहिले, त्या विभागाच्या आरओंची टचौकशी व्हायला हवी अशा वक्तव्यांसह यंत्रणेला फैलावर घेतलं.
