तरुणाला घाटात बोलावलं, धारदार शस्त्राने कमलेशला संपवलं, नाशिकमधल्या ‘त्या’ हत्येचं गूढ उकललं; धक्कादायक कारण

मित्रांच्या ‘थर्टी फर्स्ट’ पार्टीसाठी पैशांची आणि महागड्या मोबाइलची लालसा तरुणाच्या जीवावर बेतली. मोहदरी गावाच्या शिवारातील पास्ते घाटात आढळलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा लावत सिन्नर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अल्पवयीनासह एका संशयितास ताब्यात घेतलं.

नेमकं काय घडलं तरी काय?

मंगळवारी दि. 30 डिसेंबर रोजी पास्ते घाटात रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राचे वार आणि गळा आवळल्याचं स्पष्ट झालं होतं. एमआयडीसी सिन्नरचे पोलीस निरीक्षक भरत जाधव व सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली.

कमलेशकुमार लिलाधर पटेल (वय 30, मूळ रा. तिघरा, गोटेगाव, मध्यप्रदेश) असं त्याचं नाव असल्याचं तपासात स्पष्ट झालं. तो सध्या माळेगाव (ता. सिन्नर) येथे भाड्याच्या खोलीत राहत असून औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. याप्रकरणी अरुण बाळू पदमिरे (रा. उबाडे, घोटी, ता. इगतपुरी‌) आणि कोनांबे येथील एका विधीसंघर्षित बालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयितांनी पार्टी देण्याच्या बहाण्याने कमलेशला पास्ते घाटात नेले. तेथे त्याच्याकडील महागडा मोबाइल हिसकावला. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयितांनी धारदार चॉपरने कमलेशच्या पाठीवर व पायावर वार केले आणि गळा दाबून हत्या केली.

गोपनीय माहिती अन् सापळा

संशयित सिन्नरहून कोनांबेच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील पुलाजवळ सापळा रचला. मोटारसायकलवरून येणाऱ्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक भरत जाधव, हेमंतकुमार भामरे, उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे, तसेच एमआयडीसी सिन्नर, सिन्नर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *