गावात सापडली बॉडी, बाजूला ब्लँकेट, दांडक्याचे चार तुकडे अन् पोलिसांनी केला उलगडा; नेमकं काय घडलं?

म्हसळा तालुक्यातील खानलोशी आदिवासीवाडी परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाचा रहस्यभेद दिघी सागरी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने केला आहे. 24 डिसेंबर रोजी या परिसरात एक शव आढळून आल्याने गावात खळबळ उडाली होती. कोणतीही ठोस ओळख नसताना आणि अत्यल्प पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ठरवत पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत दोन आरोपींना अटक केली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिघी सागरी पोलिसांनी सर्वप्रथम बोर्लीपंचतन बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्याचबरोबर गुप्त माहिती, स्थानिक चौकशी आणि शास्त्रशुद्ध शोध पद्धतींचा अवलंब करून मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृताचे नाव शशांक कुडाळकर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपास अधिक वेगाने पुढे सरकला. मृतदेहाजवळ आढळलेले एक ब्लँकेट, घटनास्थळावरील हालचाली आणि वेळेची सांगड घालत पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

लाकडी दांडका घेतला अन्…

तपासात प्रकाश लक्ष्मण वाघमारे आणि संदीप चंद्रकांत पवार (दोघेही रा. खानलोशी आदिवासीवाडी, ता. म्हसळा) यांची नावे समोर आली. दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या निवेदनानुसार, 19 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास ते म्हसळा–दिघी रोडने एच.पी. पेट्रोलपंप परिसरातून पायी जात असताना शशांक कुडाळकर समोरून येताना दिसला. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या शाब्दिक वादातून पुन्हा वाद उफाळून आला. संतापाच्या भरात रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी दांडक्याने शशांकला मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

 

लाकडाचे चार तुकडे अन् झाला उलगडा

गुन्ह्याचा संशय आपल्यावर येऊ नये म्हणून आरोपींनी वापरलेला लाकडी दांडका चार तुकड्यांत फोडून लपवून ठेवला, तसेच मृतकाच्या खिशातील ओळखपत्रही लपवले. चौकशीत ही सर्व सामग्री आरोपींकडून जप्त करण्यात आली. या पुराव्यांमुळे तपास अधिक मजबूत झाला. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चौलकर तसेच दिघी सागरी पोलिस पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *