हॉटेल प्राइड चौकातील डाबो क्लबजवळ दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत २८ वर्षीय प्रणय नरेश नन्नावरे (रा. महाल) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नागपूर शहरातील सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास ही थरकाप उडवणारी घटना घडली. या घटनेत ३४ वर्षीय गौरव ब्रिजलाल कारडा (रा. कळमना रोड) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ख्रिसमसच्या निमित्ताने गुरुवारी मध्यरात्री डाबो क्लबमध्ये काही युवकांनी पार्टी आयोजित केली होती. पार्टी आटोपल्यानंतर साधारण चार वाजताच्या सुमारास क्लबबाहेर उभ्या असलेल्या दोन गटांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरु असताना पाहता पाहता हा वाद हिंसक हाणामारीत रूपांतरित झाला. या दरम्यान आरोपी मेहुल रहाटे याने प्रणय नन्नावरे आणि गौरव कारडा यांच्यावर धारदार हत्यार, लोखंडी सळई तसेच विटेने बेदम हल्ला केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यात प्रणय नन्नावरे हा गंभीर जखमा झाला, तर गौरव कारडा यालाही गंभीर दुखापत झाली होती. दोघांनाही तात्काळ ऑरेंज सिटी हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी प्रणय नन्नावरे याला मृत घोषित केले. तर गौरव कारडा याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तो सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.
