विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पुढील दहा दिवसात निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली होती. या प्रश्नाचं उत्तर जवळपास निश्चित झालं असून महाराष्ट्रातील सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेलं मराठमोळं नाव समोर आलं आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’चे (एनआयए) प्रमुख सदानंद वसंत दाते यांना प्रतिनियुक्तीतून मुक्त करून, पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
रश्मी शुक्ला होणार निवृत्त
विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला तीन जानेवारी २०२६ रोजी निवृत्त होत आहेत. शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर सदानंद दाते हेच महाराष्ट्रातील सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे शुक्ला यांच्या जागी दाते यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.
कोण आहे सदानंद दाते?
सन १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या दाते यांची नियुक्ती गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘एनआयए’च्या प्रमुखपदी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दाते यांना मुदतीपूर्वीच प्रतिनियुक्तीतून मुक्त करून तत्काळ प्रभावाने महाराष्ट्रात परत पाठवण्यास मंजुरी दिली आहे, असे सोमवारी उशिरा जारी केलेल्या सरकारी आदेशात म्हटले आहे.
