77 वर्षांच्या आजीबाईंच्या विजयाची चर्चा; युवकांसाठी ठरल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

जळगावच्या नशिराबादच्या नगरपरिषद निवडणुकीत 77 वर्षांच्या जनाबाई रंधेंनी विजय मिळवलाय. वयाची पंचाहत्तरी उलटल्यानंतरही राजकारणात सक्रिय झालेल्या आजीबाईंचं सर्वांनाच कौतुक आहे. नोकरी धंद्यात चाळीशी उलटल्यानंतर निवृत्तीची वाट पाहणा-यांच्या डोळ्यात जनाबाई आजींनी झणझणीत अंजन टाकलं आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद नगरपरिषदेच्या या नवनियुक्त नगरसेवक जनाबाई रंधे. जनाबाई रंधे यांचं वय आहे 77 वर्ष. जनाबाईंनी राजकारण करण्याचं कोणतंही वय नसतं हे दाखवून दिलं आहे. राजकारणात पंचाहत्तरीनंतर निवृत्त होतात. पण जनाबाईंनी 77 वर्षी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दे हरी खाटल्यावरी असंही त्यांनी केलं नाही. प्रचारात त्या अक्षरक्षः अनवाणी फिरल्या आबहेत. वॉर्डात घरोघरी प्रचार केला. मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. जनाआजींचा उत्साह पाहून अनेकांचं मतपरिवर्तन झालं.

नशिराबादच्या वॉर्ड क्रमांक-7मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. प्रचाराच्या काळात त्यांचा प्रचारही लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. त्यांचा मुलगा नातू सगळे प्रचारात होते. खुद्द पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटीलही त्यांच्या प्रचारासाठी येऊन गेले होते. खरं तर जनाबाई आजींच्या सुनबाईंचं नाव उमेदवारीसाठी पुढं आलं होतं. पण आजीबाईंनी स्वतःहून निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली आहे. शेवटी गावक-यांनीही आजींच्या शब्दाचा मान ठेऊन उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे.

पुढच्या कार्यकाळात स्थानिकांचे सगळे प्रश्न सोडवण्याचा निर्धार आजींनी केलाय. त्यांचा उत्साह त्यांच्या सहका-यांसाठी प्रेरणादायी आहे. राजकारणाला आणि समाजकारणाला वय नसतं हे जनाबाई आजींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *