नवी मुंबईत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 7 महिलांची सुटका, आरोपींना अटक

तळोजा एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सात पीडीत महिलांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळोजा एमआयडीसी येथील हॉटेल नवनाथ इन, लॉजिंग येथे लॉज मॅनेजर ग्राहकांकडून 2,000 रुपये घेऊन महिलांना दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या सांकेतिक इशाऱ्यावरून रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी लॉजवर छापा टाकण्यात आला. छाप्यात लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेली एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व सहा पीडित महिला आढळून आल्या.

तपासात लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी व सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव यांनी संगनमत करून महिलांना वेश्याव्यवसायासाठी लॉजमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना 22 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे.

भारतात महिलांच्या आणि बालकांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. त्यातीलच एक कायदा म्हणजे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956, हा स्त्रिया आणि बालकांच्या लैंगिक शोषणासाठी होणारी मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय आणि मुलींचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी भारतीय संसदेने हा कायदा अस्तित्वात आणलेला कायदा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *