टोल नाक्यावरुन वाहनं 80 Km/h गेली तरी टोल कट होणार; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन; सरकारचे ₹6000 कोटी वाचणार

देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्रणाली आणि एआय आधारित महामार्ग व्यवस्थापन 2026 अखेर पूर्णपणे अंमलात येणार असून, यामुळे टोल नाक्यांवरील प्रतीक्षा पूर्णतः संपेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. टोल चोरी थांबेल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त होईल, असेहे ते म्हणाले.

नेमकी ही योजना काय?

यात नंबर प्लेट ओळख, उपग्रह तंत्रज्ञान आणि फास्टॅग यांच्या एकत्रित वापरातून टोल संकलन केले जाईल. परिणामी वाहनांना टोलवर थांबावे लागणार नाही. पूर्वी टोल भरण्यास 3 ते 10 मिनिटे लागत. फास्टॅगमुळे हा वेळ 60 सेकंदांपर्यंत आला. मल्टी-लेन फ्री फ्लो टोलनं वाहनांना कमाल 80 किमी प्रतितास वेगाने टोल पार करता येईल आणि कुणालाही थांबवले जाणार नाही.

MLFF प्रणाली कशी काम करणार?

तांत्रिक दृष्ट्या ही फास्टटॅग, वाहन नोंदणी क्रमांक (व्हिआरएन), जीपीएस, ऑटोमेटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर), आणि एआय-आधारित तंत्रज्ञानावर आधारित आहे.

वाहन चालत असतानाच टोलची रक्कम आपोआप कापले जाणार आहे. यासाठी कोणतेही बैरिकेट किंवा टोल बूथ उभारण्याची गरज नाही. ठराविक ठिकाणावरुन कार अगदी 80 किमीच्या वेगाने गेली तरी टोल आपोआप कापला जाईल.

कॅमेरे आणि सेन्सर वाहनाची ओळख पटवून फास्टटॅगच्या खात्यातून टोल रक्कम कापून घेतली जाते. महामार्गावर गॅन्ट्री उभारल्या जाणार असून, ज्यावर उच्च दर्जाचे कॅमेरे आणि सेन्सर बसवलेले असतील. फास्टटॅग देयके 7 दिवसांत कापली जातील; वेळेत न भरल्यास ई-नोटीस मिळेल आणि दंडही भरावा लागेल.

वैशिष्ट्ये आणि फायदे काय?

टोल प्लाझावर थांबावं लागणार नाही. ज्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि इंधनाची बचत होऊन साधारण 1500 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. म्हणजेच वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच कमी इंधन खर्चामुळे प्रदूषण कमी होणार असल्याने ही पर्यावरणपूरक यंत्रणा ठरणार आहे. सध्याच्या फास्टटॅग प्रणालीला या नव्या प्रणालीत इंटीग्रेट केलं जाईल. एआयच्या मदतीने वाहनांची अचूक ट्रॅकिंग आणि टोल वसुली केली जाईल. टोल चोरी थांबेल आणि सरकारी महसूल सहा हजार कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

सध्या इथे सुरु आहेत चाचण्या

देशातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणाली गुजरातमधील चोर्यासी टोल प्लाझा (राष्ट्रीय महामार्ग 48 वर) आणि हरियाणातील घरौंडा टोल प्लाझा (राष्ट्रीय महामार्ग 44 वर) येथे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील पाच टोल प्लाझावरही चाचणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *