जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील बेपत्ता विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या या 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह तरवाडे बुद्रुक गावाजवळच्या विहिरीमध्ये सापडला आहे. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी तिचा मतदेह सापडला असल्याने तिच्यासोबत नेमकं काय घडलं याबद्दलचं गूढ वाढलं आहे.
रहस्यमयरित्या झाली गायब
12 डिसेंबर रोजी शाळेतून घरी परतताना ही मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली. शुक्रवार सायंकाळपासून तिचा शोध सुरु होता. अखेर हा शोध अगदीच अनपेक्षितपणे संपला जेव्हा गावाजवळील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. शेवटची माहिती हाती आली तेव्हा तिचा मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. शवविच्छेदनानंतरच तिचा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दलची माहिती मिळू शकते. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
अखेर पोलिसांना कळवलं
सदर मुलगी शुक्रवारी (12 डिसेंबर 2025) सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. गावातील स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून शोधमोहीम राबवली जात होती. आज सकाळी या मुलीचा शोध घेताना तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
गावाच्या वेशीवर सापडली बॅग
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी ही मुलगी शुक्रवारी सकाळी 10 वाजता शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर घरी न परतल्याने पालकांनी शोध घेतला, मात्र तिचा मागमूस लागला नाही, अशी माहिती समोर आली आहे. तिचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळले आहे, ज्यामुळे अपहरणाची शंका व्यक्त होत असतानाच तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
शेवटची सीसीटीव्हीत दिसली
गावातील चौकात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती बॅग घेऊन चालत असल्याचं दिसून आलं. यानंतर ती कोणालाही दिसली नाही. त्यामुळे ती कोणासोबत गेली? तिच्यासोबत नेमकं काय झालं? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलीस या प्रकरणासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत.
