कोल्हापूर शहराशेजारी असणाऱ्या उजळाईवाडीमध्ये एका विचित्र अपघातात लहान मुलाने जीव गमावला आहे. क्रिकेट खेळताना शेजारच्या घरावर चेंडू आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अफान असिफ बागवान असे मृत मुलाचे नाव आहे. शाळेला सुट्टी असल्याने अफान सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. खेळताना चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीवर गेला. तो आणण्यासाठी अफान गच्चीवर गेला असता घराच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11 हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब वाहिनीला त्याने स्पर्श केला. अफान जोरदार विद्युत धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या इमारतीवरून विमानतळाला पुरवठा करणारी उच्चदाब वाहिनी जाते. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
माय-लेकाचा मृत्यू
20 नोव्हेंबर रोजी नागपूरमधील खापरखेडा येथील जय भोले नगरमध्ये झालेल्या अशाच एका विचित्र अपघातामध्ये माय-लेकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला. निर्मला सोनटक्के (55 वर्ष) आणि लोकेश सोनटक्के (29 वर्ष) या दोघांनी या विचित्र घटनेत आपले प्राण गमावले. घरात ओले कपडे सुकवत असताना लोखंडी तार विद्युत वायरच्या संपर्कात आली, ज्याने निर्मलाला धक्का बसला. लोकेशने आईनेला वाचवण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याला स्वतःही विजेचा धक्का बसला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.
शेतात काम करताना मृत्यू
नागपूरमधील या अपघाताच्या तीन दिवस आधी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील वसरणी परिसरात 23 वर्षीय रोहित मंडले या तरुणाचा विजेचा झटका बसल्याने मृत्यू झाला. रस्त्यालगतच्या उच्चदाब वाहिनीच्या संपर्कात आल्याने रोहितला 36 केव्हीचा धक्का बसला. हा प्रकार घडला तेव्हा रोहित शेतात काम करत होता. यातच त्याचा मृत्यू झाला. रोहितवरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं. त्याच्या कुटुंबात त्याच्या व्यतिरिक्त कोणताही अर्थार्जन करणारा सदस्य नाहीये.
कारखान्यात विजेचा धक्का लागून मृत्यू
28 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील तरापूर एमआयडीसीमध्ये विजेचा झटका लागून 39 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. प्रसाद संखे असं या व्यक्तीचं नाव होतं. कारखान्यात नियमित विद्युत काम करत असताना प्रसादला विजेचा धक्का बसला. पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली.
हे सर्व अपघात मुख्यतः घरगुती किंवा कामाच्या ठिकाणी झाले असून, त्यामुळे महावितरण (MSEDCL) किंवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
