वातानुकूलित लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना आता पासचे ओळखपत्रही तिकीट तपासनीसांना दाखवावे लागणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचे बनावट तिकीट-पास तयार करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे. यूटीएस अॅपमधीलच ऑनलाइन तिकीट आणि पास ग्राह्य धरावा आणि ऑफलाइन पद्धतीने काढलेल्या पाससोबत ओळखपत्राची तपासणी सक्तीने करावी, अशा सूचना महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बनावट तिकीट प्रकरणानंतर पाऊल
बनावट तिकीट-पासचा आढावा घेण्यासाठी महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेतली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बाजारात उपलब्ध असलेल्या एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून वातानुकूलित लोकलचा बनावट पास तयार केल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वेवरील तीन आणि पश्चिम रेल्वेवरील दोन प्रकरणांत विविध रेल्वे पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
…ते पास ग्राह्य धरले जाणार नाहीत
ऑफलाइन पद्धतीने पास काढण्यासाठी रेल्वेकडून अधिकृत ओळखपत्र देण्यात येते. त्याचा आधार घेऊन विशेषांकाचा समावेश पासमध्ये केला जातो. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीट तपासनीसांनी पाससह ओळखपत्राची तपासणीही करावी. भारतीय रेल्वेचे अधिकृत यूटीएस अॅपमध्ये दिसणारे तिकीट आणि पास ऑनलाइन वैध तिकीट-पास म्हणून ग्राह्य धरावे. अन्य कोणत्याही माध्यमांमध्ये दाखवण्यात येणारे ऑनलाइन पास ग्राह्य धरू नयेत, अशा स्पष्ट सूचना टीसींना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष तिकीटासोबत ओळखपत्र नसेल तर तिकीट आसूनही दंड आकारण्यात येईल. तसेच केवळ यूटीएस अॅपवरील तिकीटच अधिकृत ऑनलाइन तिकीट मानलं जाईल.
सात वर्षांचा तुरुंगवास
रेल्वे कायद्यानुसार विनातिकी प्रवाशांसाठी 500 रुपये दंड म्हणून रक्कम भरावी लागते. मात्र बनावट तिकीट वापरणे हे रेल्वेची फसवणूक करण्यासारखे प्रकरण आहे. अशा गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 (2), 336 (3) आणि (4), 340 (1) आणि (2), 3 (5) नुसार कमाल सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांत तातडीने कारवाई पूर्ण करावी, यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी मुंबई रेल्वे पोलिसांशी अधिक समन्वय साधावा, अशा सूचनाही महाव्यवस्थापक गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
