पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ संरेखना (अलाइन्मेंट) रद्द करून नवीन पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)- अहिल्यानगर- निंबळक-पुणतांबा- पिंपळगाव- साईनगर शिर्डी-नाशिक असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
‘पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइन्मेंट महाराष्ट्र रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तयार केली होती. पुणे-नाशिक रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग नारायणगावातून जात होता. तो ‘जीएमआरटी’ या आंतरराष्ट्रीय खगोल-निरीक्षक प्रकल्पाजवळून जाणारा होता. विज्ञान-तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने या मार्गाबाबत आक्षेप नोंदवला.
रेल्वे लाइनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याने नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला आहे. राज्य सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या चर्चेनंतर ‘जीएमआरटी’ क्षेत्र टाळून नवीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. नवीन मार्ग हा पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)-अहिल्यानगर- निंबळक-पुणतांबा-पिंपळगाव- साईनगर शिर्डी-नाशिक असा असेल,’ असे वैष्णव यांनी सांगितले.
