तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारी अशी आख्यायिका असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती राहतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कधी होणार जत्रोत्सव?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी खास ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026रोजी होणार आहे. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात.
भाविकांची मोठ्या संख्येत उपस्थिती
वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना केंद्रबिंदु मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याचे श्री.आंगणे यांनी सांगितले. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दशर्वतात.
भराडावर प्रकट झाल्यामुळे पडले नाव
मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.
