रस्त्याने चालत असताना अचानक महिलेला प्रसववदना सुरू झाली. वेदना सुरू झाल्यानंतर ती अचानक पदपथावर बसली. फुटपाथवर बसलेली ही महिला वेदनेने विव्हळत असल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी त्या परिसरात धाव घेतली. पोलसांनी गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र तोपर्यंत तिच्या वेदना आणखी वाढल्या आणि तिथेच महिलेची प्रसुती झाली. मुंबईतील डोंगरी परिसरातील ही घटना आहे.
धारावी येथे वास्तव्यास असलेली 36 वर्षीय माला नाडर ही गर्भवती महिला पतीसोबत शनिवारी डोंगरी परिसरातून चालली होती. मात्र अचानक पोटात दुखू लागल्याने माला तिथेच असलेल्या फुटपाथवर बसल्या. त्यांना पुढे चालताही येईना. प्रसव वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेला पाहिल्यानंतर स्थानिकांनी डोंगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. लगेचच डोंगरी पोलिसांच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
प्रसूती वेदना वाढत असल्याने महिलेला चालतादेखील येत नव्हते. त्यामुळं अशा परिस्थितीत तिला दुसरीकडे नेणे धोकादायक ठरू शकत होतं. त्यामुळं पोलिसांनी तिथेच तिची प्रसुती करायची ठरवली. पोलिस कॉन्स्टेबल खडसे यांनी चादर तसंच इतर वस्त्रांची व्यवस्था करत महिलेच्या चारही बाजूला आडोसा तयार करुन तिची प्रसूती करण्यात आली. महिला कॉन्सटेबलने देखील महिलेला मानसिक आधार देत मदत केली.
महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळाची नाळ कापणे महत्त्वाचे होते. मात्र हे काम डॉक्टरच करू शकतात. त्यामुळं महिला पोलिसांनी अगदी अलगद बाळाला कपड्यात गुंडाळून व महिलेला गाडीत ठेवलं. तसंच, जवळच्या जे.जे रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनीही लगेचच बाळाची नाळ कापून बाळाला आईपासून वेगळे केले. तसंच, डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले.
