नशापानी व वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणाऱ्या प्लान तयार करणाऱ्या मंगळसूत्र चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळसूत्र हिसकावण्याचे काम अर्पन उर्फ चिच्या स्वप्नील डोंगरदिवे (वय 18, दोघेही रा. मुकुंदवाडी) व त्याचा मित्र अमीत उर्फ बबुआ या दोघांनी केले. तर चोरीचे सोने गहाण ठेवण्याचे काम विक्की उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे (वय 34, रा. मुकुंदवाडी ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळसूत्र हिसकावणाऱ्या घटनेतील अमील उर्फ बबुआ याचा परिसरात शोध सुरू आहे.
पोलिसांनी खाक्या दाखवताच कबुली
या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दि. 26 नोव्हेंबर दुपारी गुन्हे शाखेचा पथक गस्तीवर असताना सातारा परिसरातील चेन स्नॅचिंग प्रकरणातील संशयीत आरेापी मुकुंदवाडीत फिरत असल्याची माहिती मिळाली. या गुन्हे शाखेच्या पथकाने इच्छामणी हॉटेलजवळून अर्पन उर्फ चिच्या स्वप्नील डोंगरदिवे (वय 18, रा. मुकुंदवाडी) हा दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, तो सुरुवातीला गोलमोल उत्तरे देत होता. त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चेन स्नॅचिंगची कबुली दिली.
मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चासाठी प्लान केला
अर्पनने दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी तो विक्की उर्फ हेल्मेट, अमीत उर्फ बबुआ आणि सय्यद मतीन असे चौघे सोबत नशा करत होते. त्यावेळी विक्कीने पार्टीसाठी तसेच मुलीच्या वाढदिवसासाठी पैसे नसल्याने रात्री चेन स्नॅचिंग करण्याचा प्लान बनवला. सय्यद मतीनच्या दुचाकी क्रमांक एमएच 28 बीएम 6165 नंबर प्लेट टेपने झाकून दोघे रात्रभर फिरले. सातारा परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ हिसकावून दोघे पळाले. मात्र थोड्याच अंतरावर गाडीची वायर तुटल्याने मंगळसूत्र चोरांनी दुचाकी रस्त्यातच सोडून ते थेट विक्कीच्या घरी पोहोचले. चोरी केलेली सोनसाखळी विक्री करण्याचे काम हेल्मेटने हाती घेतले. त्याने मुकुंदवाडीतील भरत ज्वेलर्स येथे जाऊन आई आजारी आहे असे सांगून दागिने गहाण ठेवले.
कुख्यात ‘विक्की हेल्मेट’सह चिच्या ताब्यात
त्यातून मिळालेल्या 10 हजारातून तिघांनी नशापानात व वाढदिवस साजरा करण्यात वापरल्याचे तपासात समोर आले आहे. अर्पनकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विक्की उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे याला पोलिसांनी मुकुंदवाडी रेल्वे पटरीजवळून ताब्यात घेत अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने भरत ज्वेलर्सच्या जयेश दिलीप सोनी याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानेदेखील आरोपींनी दागिने गहाण ठेवल्याचे कबुल करत ते दागिने पोलिसाच्या स्वाधीन केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे अर्जुन कदम, हवालदार योगेश नवसारे, विजय निकम, योगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, श्रीकांत काळे, राजेश यदमळ, जालींदार गोरे, राहुल बंगाळे यांच्या पथकाने केली.
