भरधाव चारचाकीची धडक, दुचाकीवरील कुटुंब उद्ध्वस्त, पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू

चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी व एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाजवळ सोमवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. सोमनाथ भोयर (वय ३८), निकिता सोमनाथ भोयर (वय ३२) व पुरब सोमनाथ भोयर (वय १२) सर्व रा. सेलू (काटे) अशी मृतकांची नावे आहेत. तर कान्हा सोमनाथ भोयर (वय ६) हा गंभीर जखमी आहे.

गणेशनगर येथून मामसासऱ्याच्या घरी वास्तू पूजन कार्यक्रम आटोपून सोमनाथ भोयर हे कुटुंबासह दुचाकीने आपल्या घरी परतत होते. दरम्यान, नवोदय विद्यालयाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नी व एका मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. चारचाकी वाहन वायगाव येथील आहे. घटनास्थळी तातडीने नागरिकांनी धाव घेत जखमी मुलाला त्वरित सावंगी येथील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फरार वाहनचालकाच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *