देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका अतिप्रचंड प्रमाणात वाढत असतानाच उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याच्या झोताचा थेट परिणाम मध्य भारतासह पूर्वोत्तर भारत आणि महाराष्ट्रावरही दिसू लागला आहे. दक्षिणेकडील किनारपट्टी भागामध्ये समुद्रावर तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं या राज्यांमध्ये मात्र पावसाच्या सरींचा अंदाज असल्यानं या थंडीच्या वातावरणात तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा अपवाद ठरत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात मात्र शहरी भाग वगळता उर्वरित राज्यात थंडीचा कडाका वाढत असून, तापमानाचा आकडा एकेरी अंकावर आल्याचं स्पष्ट होत आहे.
राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार
राज्यातील तापमानात सध्या लक्षणीय चढ- उतार पाहायला मिळत असून, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल तापमानात काही अंशांनी वाढ झाली आहे. तर, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गारठा वाढला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी धुक्याची चादर आणि सायंकाळनंतर तापमानात होणारी घट पाहता रस्त्यावरील वर्दळही गावखेड्यांमध्ये कमी झाली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद होत असून, दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये 4 डिसेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सज्या राज्यात सर्वात कमी तापमान धुळ्यात असून इथं पारा 7.5 अंशांपर्यंत खाली आला आहे. निफाड, ब्रह्मपुरी, नाशिकमध्येसुद्धा इशीच स्थिती असून महाबळेश्वरहून ही ठिकाणं अधिक थंड असल्याचं इथं स्पष्ट होत आहे.
राज्याच्या तापमानात शुक्रवारी किंचित वाढ दिसून आली. मुंबईच्या तापमानातही सातत्याने चढ – उतार पाहायला मिळाले. एकंदरच राज्यात पहाटे आणि रात्री गारवा, तसेच दिवसभर बोचरे वारे आणि काही भागांमध्ये दुपारच्या वेळी तळपता सूर्य अशी काहीशी संमिश्र स्थिती पाहायला मिळत असून, पुढील 48 तास हे चित्र फारसं बदलणार नाही.
जळगावात गुलाबी थंडी…
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात थंडीचा जोर वाढला असून जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरात थंडी वाढली आहे. अजिंठा डोंगर रागांमध्ये थंडी रोज वाढत आहे. त्यात धुके देखील पडायला लागल्याने अजिंठा डोंगर खूपच सुंदर असे दृश्य दिसत आहे.
तिथं देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून, (Jammu kashmir, Himachal Pradesh, uttarakhad) जम्मू काश्मीरमध्ये प्रामुख्यानं खोऱ्यात प्रचंड हिमवृष्टी झाली आहे. तर, हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्र, स्पितीचं खोरं इथंसुद्धा बर्फवृष्टी झाली असून, जलस्त्रोत गोठण्यास सुरुवात झाली आहे. उत्तराखंडच्या डोंगळाळ भागांवरही बर्फाचं अच्छादन आणि मैदानी क्षेत्रांमध्ये कडाक्याची थंडी असं चित्र पाहायला मिळत असून या थंडीचा जनजीवनावरही परिणाम होताना दिसत आहे.
