गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची (गेल) नैसर्गिक वायूपुरवठा करणारी वाहिनी फुटल्याने महानगर गॅस लिमिटेडकडून होणारा ‘सीएनजी’चा पुरवठा सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाला. ४८० पैकी ७० टक्के पंपांचा पुरवठा दुपारपर्यंत कमी दाबाने सुरू होता. मात्र, त्यानंतर हा पुरवठा कोलमडल्याने हजारो वाहनांना फटका बसला.
केंद्र सरकारी गेल लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडून महामुंबईतील १० लाखांहून अधिक वाहनांना सीएनजी आणि २० लाखांहून अधिक घरांना स्वयंपाकासाठी तसेच कारखान्यांना औद्योगिक वापरासाठी पीएनजीचा पुरवठा होतो. हा वायूपुरवठा महानगर गॅसच्या वडाळा येथील सीजीएस केंद्रातून होतो. मात्र, त्या स्थानकात वायू घेऊन येणाऱ्या वाहिनीतच रविवारी सकाळी बिघाड झाल्याने मुंबईतील सीएनजी पुरवठा बाधित झाला. हे चित्र सोमवारीदेखील होते.
मुंबईत महानगर गॅसकडून ४८० पंपांना सीएनजीचा पुरवठा होतो. कुठल्याही पंपाकडे सहसा केवळ एक दिवसाचा साठा असतो. हा साठा रविवारी रात्रीपर्यंतच पुरला. रविवारी रात्री महानगर गॅसने तेल कंपन्यांमार्फत केवळ त्या कंपन्यांचा नियमित समन्वय असणाऱ्या पंपांना सीएनजीचा कमी दाबाने पुरवठा केला. त्यामुळे ७० टक्के पंप कमी दाबाने असले तरी सुरू होते. मात्र, हा साठाही बहुतांश पंपांवर सोमवारी सकाळी ११ वाजता संपला, असे मुंबई पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, खासगी पंप सकाळी ११ ते दुपारी १२दरम्यान सीएनजीने रिते झाल्यानंतर महानगर गॅसने काही पंपांना कमी दाबाने पुरवठा सुरू ठेवला होता. त्यामध्ये महानगर गॅसचे स्वत:चे पाच ते सात पंप आणि सरकारी तेल कंपन्यांच्या निवडक कंपन्यांना समावेश होता. मात्र, जेमतेम ३५ ते ४० टक्के चारचाकी वाहनांना सीएनजी मिळू शकला. दरम्यान, अनेक स्कूलबस दिवसभरातील फेऱ्या पूर्ण करू शकल्या नाहीत. अनेकांना मुलांना आणण्यासाठी जावे लागले.
३८९ पैकी २२५ पंपांचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा महानगर गॅस लिमिटेडने केला. दुरुस्तीचे काम मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ दुपारपर्यंत पूर्ण होऊन गॅस पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याचे महानगर गॅसने स्पष्ट केले.
