प्रगत उपचारांमुळे मधुमेह आटोक्यात आणणे शक्य

प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे मधुमेह आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. मात्र उपचारांच्या जोडीला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे, मार्गदर्शनानुसार योग्य आहार, व्यायाम, पथ्य पाळत औषधे घेणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे सर्वाना मधुमेहमुक्त जीवन जगता यावे या दृष्टीने आम्ही कार्यरत असल्याचे ‘अपोलो शुगर’च्या अध्यक्ष आणि ‘अपोलो रुग्णालया’च्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका संगीता रेड्डी म्हणाल्या. ‘अपोलो शुगर क्लिनिक्स लिमिटेड’ने बुधवारी विलेपार्ले, कांदिवली, चेंबूर आणि ताडदेव येथे चार केंद्रांच्या उद्घाटनासह मुंबईतील आपल्या प्रवेशाची घोषणा केली. याप्रसंगी संगीता रेड्डी बोलत होत्या.

नुकतेच परळ येथे संगीता रेड्डी आणि ‘अपोलो शुगर क्लिनिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गगन भल्ला यांच्याद्वारे उद्घाटन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेह म्हणजे काय, तो नेमका कशामुळे होतो, त्याबाबत कोणते गैरसमज आहेत, विविध वयोगटातील नागरिकांना होणारी मधुमेहाची लागण याबाबत चर्चा करत मार्गदर्शन केले गेले.

मधुमेहाची व्याप्ती हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. मुंबईकरांची बदलती जीवनशैली, धावपळ, अनियंत्रित आहारही याला काही अंशी कारणीभूत असल्याने मधुमेहग्रस्त रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवत लढा दिल्यास निश्चितच मधुमेह आटोक्यात आणला जाऊ शकतो, असे मार्गदर्शन या वेळी केले गेले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, प्रगत वैद्यकीय उपचारांची जोड देत मधुमेहावर उपचार दिले जात आहेत. दर्जात्मक सेवा, सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने अनुभवी, उच्च प्रशिक्षित डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. तसेच या डॉक्टरांच्या जोडीला विशेष आहारतज्ज्ञ, मधुमेहासंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या परिचारिका यांचासुद्धा समावेश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *