नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकिट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) तैनात झाल्यानंतर आता सर्व लक्ष तिकिट नोंदणीकडे लागले आहे. सुरुवातीला एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि अकासा या तीन विमान कंपन्या सेवा देणार आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत विमानतळावरून प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल असा अंदाज आहे, मात्र विमान कंपन्या अजूनही विमानतळाकडून येणाऱ्या सूचनेची वाट पाहत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) तैनात झाल्यानंतर आता प्रवाशांचे लक्ष प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकिट नोंदणी कधी सुरू होईल याकडे लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरनंतर तिकिट नोंदणी सुरू होऊ शकते. थंडीच्या दिवसात प्रवाशांची वर्दळ वाढते. सामान्यतः देशांतर्गत प्रवासासाठी उड्डाणाच्या ३० दिवस आधी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्हिसा आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिकिटांची नोंदणी करता येते.
कोणत्या विमानसेवा होणार सुरू
नवी मुंबई विमानतळावरून सुरुवातीच्या टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि अकासा या तीन विमान सेवा सुरू होणार आहेत. विमानतळावरून प्रत्यक्ष कामकाज डिसेंबरअखेरपर्यंत सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, विमान कंपन्या अजूनही तिकिट नोंदणी कधी सुरू होईल याबद्दल निश्चित माहिती देण्यास असमर्थ आहेत. त्या विमानतळाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनेची वाट पाहत आहेत.
विमानतळाच्या सूत्रांनी १५ नोव्हेंबरनंतर तिकिट नोंदणी सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच डिसेंबरअखेरपासून विमानोड्डाणांना वेग येईल असेही सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलालाही (CISF) प्रत्यक्ष उड्डाणासाठीच्या सज्जतेची नेमकी तारीख अद्याप कळलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल याबाबत उत्सुकता आहे.
नियोजनासाठी वेळ आवश्यक
या नव्या विमानतळाकडे प्रवाशांची वाहतूक वळवण्यासाठी विमान कंपन्यांना काही कालावधी हातात मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विमानतळाने तिकीटविक्रीच्या तरखा जाहीर करणे आवश्यक असल्याची अपेक्षा विमान कंपन्यांकडून व्यक्त केली जात आहे. या विमानतळाला प्रवाशांकडून किती प्रतिसाद मिळतो, यावर विमानउड्डाणांचे नियोजन अवलंबून असेल, याचीही आठवण कंपन्यांकडून केली जात आहे.
