दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळं संपूर्ण देश हादरला आहे. या दहशतवादी हल्ल्याबाबत तपास यंत्रणांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यात बसलेला दहशतवादी मोहम्मद उमर याच्याबाबतही खळबळजनक माहिती समोर आली आहे. तसंच, दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. लाल किल्ला परिसरात चालत्या कारमध्ये स्फोट झाल्याचं यात पाहायला मिळतंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाची नेमकी वेळ दिसते. स्फोटाचे रेकॉर्डिंग असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेड फोर्स चौक स्पष्टपणे दिसत आहे.
लाल किल्ल्यावरील देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे स्फोट झाल्याचे दिसतंय. या चार खिडक्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असताना अचानक स्फोट होतो. स्फोट झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज बंद होताना दिसतेय.
स्फोटापूर्वी सुमारे 30 ते 40 मिनिटे असिफ अली रोडवर वीस गाड्या उभ्या असलेल्या दिसत आहेत. तर, उमर त्याच गाडीत बसलेला दिसत आहे आणि एकटाच होता.
उमरने 31 ऑक्टोबर रोजी त्याचा फोन बंद केला बोता. त्याच्या फोनचे शेवटचे लोकेशन फरीदाबादमधील एका विद्यापीठात दाखवत होते. आत्तापर्यंत समोर आलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आणि रूट मॅपिंगनुसार उमर फोन वापरत नसल्याची शक्यता समोर येतेय. त्यामुळं फोन नसताना लाल किल्ल्यावर स्फोटके कशी नेण्यात आली? हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच, हा हल्ला पूर्वनियोजित होता का? असाही सवाल उपस्थित होतोय.
दरम्यान, उमरच्या फोनचे लोकेशन सापडत नसल्याने तो वेगळे सिमकार्ड वापरत होता का? तो फोनही स्फोटात नष्ट झाला का? या बाजूनेही तपास सुरू आहे.
