पुण्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका आई–मुलाने मिळून पित्याला मारहाण करून त्याचा खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांनंतर झालेल्या तपासात मृत्यूचे खरे कारण समोर आले असून, दौंड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू पिऊन आला म्हणून
दत्तात्रय उर्फ आबासाहेब माणिक पाटोळे (वय 47) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते दौंड तालुक्यातील नानजीव गावात राहणारे शेतकरी होते. त्यांच्या सोबत पत्नी उषा आबासाहेब पाटोळे (वय 38) आणि मुलगा संस्कार आबासाहेब पाटोळे (वय 18) हेही राहत होते. 2 मे रोजी आबासाहेब शेतातील काम आटोपून घरी परतत होते. त्यांना मद्यपानाचे व्यसन होते. नेहमीप्रमाणे त्यांनी वाटेत दारू पिऊनच घरी प्रवेश केला आणि त्यामुळे कुटुंबासोबत वाद सुरु झाला. हा वाद हळूहळू चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याच झटापटीत आबासाहेबांचा मृत्यू झाला.
