पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ पुलाजवळ रविवारी सायंकाळी ५.५० वाजता भरधाव कंटेनरने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पिता खंडू नारायण बनसुडे (वय ३५) आणि सहा वर्षांचा मुलगा रुद्र खंडू बनसुडे (दोघे रा. पळसदेव, इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक मदत न करता वाहनासह पसार झाला.
दौंड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अपघातातील मृत खंडू यांचे चुलत भाऊ संतोष बनसुडे (४०, रा. पळसदेव, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खंडू स्वतः दुचाकी चालवत पुणे-सोलापूर लेनवर कुरकुंभ पुलावरून जात होते. त्यांच्या मागे मुलगा रुद्र बसला होता.
रुद्र पळसदेव येथे सीनियर केजीत शिकत होता. तो मावशीकडे हडपसरला दिवाळीच्या सुट्टीत राहायला गेला होता. सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने रविवारी खंडू त्याला आणायला हडपसरला गेले. परत येताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिली. दुर्दैवाने याच अपघातात वडिलांचे आणि चिमुकल्या रुद्रचे जीवन संपुष्टात आले.
अपघातात खंडू आणि रुद्र यांना डोक्याला, हात-पायाला गंभीर जखमा झाल्या. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कंटेनरचालकाने जखमींना मदत न करता, पोलिसांना खबर न देता पळ काढला. दौंड पोलिस ठाण्यात भादवि आणि ‘मोटार व्हेइकल ॲक्ट’च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत. पोलिस महामार्गावर सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहेत.
