ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, शहरात अंतर्गत रिंग मेट्रो लवकरच सुरू, 29 किमी मार्गावर 22 स्टेशन्स, कसा असेल रुट?

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रोमुळे आता ठाणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. तसंच प्रवासाचा वेळही वाचणार आहे. ठाण्यातील या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम पुढील महिन्यात नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

ठाण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. 29 किलोमीटर लांबीच्या मेट्रो कॉरिडॉरचे बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होईल. या प्रकल्पाअंतर्गत तयार होणारा मार्ग वागळे इस्टेट, मानपाडा, बाळकुम आणि ठाणे जंक्शन अशा वर्दळीच्या भागांना जोडेल. हे मार्ग ठाण्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दळीचे आहेत. या ठिकाणांना मेट्रोने जोडल्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून प्रवासाचा वेळ वाचून, गैरसोयही कमी होईल.

या मार्गासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या मार्गासाठी अंदाजे 12,200 कोटी खर्च येणार असून हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महा मेट्रोकडून राबवला जाणार आहे. उल्हास नदी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दरम्यान हा मार्ग नियोजित आहे. ठाण्यातील वाढत्या लोकसंख्येदरम्यान पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय प्रदान करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. ही मेट्रो 2029 मध्ये अंदाजे 6.47 लाख प्रवाशांना रोज सेवा देईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

29 किमी मार्गावर किती आणि कुठे स्टेशन्स असतील?

या कॉरिडॉरमध्ये 22 स्टेशन्स असतील. या 22 पैकी 20 स्टेशन्स उन्नत अर्थात एलिवेटेड असतील आणि दोन भूमिगत, अंडरग्राऊंड असतील. ठाणे रिंग मेट्रोसाठी पुढील स्टेशन्स असणार ठाणे जंक्शन, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, नवीन ठाणे, गांधी नगर, नीळकंठ टर्मिनल, रैला देवी, शिवाई नगर, काशिनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, विजय नगरी, वाघबिळ, डोंगरीपाडा, मनोरमानगर, पाटीलपाडा, आझादनगर बस डेपो, वॉटर फ्रंट, बाळकुम नाका, शिवाजी चौक, राबोडी, कोलशेत इंडस्ट्रिअल एरिया, बाळकुमपाडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *