विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध; कुटुंबाने घरी बोलावलं, हात-पाय बांधले अन्…; महाराष्ट्रातील तरुणासोबत कर्नाटकात हादरवणारा प्रकार

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका 21 वर्षीय तरुणाची प्रेमसंबंधांतून निर्घृण हत्या करण्यात आली. कर्नाटकातील एका विवाहित महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून ही घटना घडली असून, महिलेच्या नातेवाईकांनीच तरुणाला बेदम मारहाण करून ठार मारले. हैदराबाद येथे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोणेगाव येथील विष्णूकांत पांचाळ (वय वर्ष 21) या नांदेडमधील तरुणाचे कर्नाटकातील नागमप्पली येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी सदर महिलेच्या नातेवाईकांनी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावले होते. तिथं पोहोचल्यानंतर आरोपी गजानन व अशोक यांनी त्यांच्या काही साथीदारांसोबत मिळून विष्णूकांतचे हात-पाय बांधले. तसंच नंतर विष्णुकांतवर अमानुष अत्याचार करत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या शरीरावर गरम चटके देऊन छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या बेदम मारहाणीत विष्णूकांत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *