ब्रेकअपनंतर मयुरेश बिल्डिंगजवळ भेट, वादावादीत सोनूचा पारा चढला, जीव वाचवायला ती नर्सिंग होममध्ये शिरली, अखेर…

गजबजलेल्या आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी भररस्त्यामध्ये एक थरारक घटना घडली. तरुणाने चाकूने वार केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तरुणी एका नर्सिंग होममध्ये शिरली, मात्र तिचा पाठलाग करत तरुणाने तेथेही तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर त्याने चाकूने स्वत:चा गळा चिरुन घेतला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे.

काळाचौकीच्या आंबेवाडी परिसरात सोनू बराय (२४) आणि मनीषा यादव हे दोघेही वास्तव्यास होते. काही काळापूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, परंतु दहा दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश इमारतीसमोर हे दोघे भेटले. यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. संतापलेल्या सोनूने खिशातून चाकू काढून मनीषावर वार करण्यास सुरुवात केली.मनीषाने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र सोनू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जीव वाचवण्यासाठी मनीषाने आरडाओरड करत जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली, मात्र सोनू तिथेही तिच्या मागोमाग गेला. नर्सिंग होममध्येही त्याने मनीषावर वार केले. आजूबाजूला नागरिक जमल्याचे पाहून त्याने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरला.

भररस्त्यात घडलेल्या या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनूला केईएम रुग्णालयात, तर मनीषाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले. सोनूला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर मनीषावर आंबेडकर रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. अनेक वार केल्यामुळे मनीषाच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली.

एका तरुणीवर चाकूने वार केले जात असल्याची माहिती जवळच कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल किरण सूर्यवंशी यांना काही नागरिकांनी दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता किरण यांनी घटनास्थळी धाव घेतली. आस्था नर्सिंग होममध्ये सोनूच्या तावडीतून मनीषाची सुटका करत तिला टॅक्सीतून त्यांनी आंबेडकर रुग्णालयात नेले. या ठिकाणी तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर तिला जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. किरण यांची तत्परता आणि प्रसंगावधान यामुळे मनीषाला वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली, मात्र मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *