लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी बातमी समोर आलीय. लाडकी बहीण योजना चालवणे राज्य सरकारसाठी डोईजड जातेय का? असा प्रश्न उभा पाहतोय. यामागे कारणही तसंच आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याचा प्रकार समोर आला होता. यावर संजय शिरसाट यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. असा प्रकार पुन्हा घडल्याचे पाहायला मिळतंय. काय घडलंय नेमकं?
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2025 च्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, या विभागाला आपल्या योजनांसाठी निधी वापरताना काटकसर करावी लागेल. सरकारने यासंदर्भात बुधवारी शासन निर्णय जाहीर करून लाडकी बहीण योजनेसाठी 3960 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर परिणाम
सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेसारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेणार आहे. उपलब्ध निधी केवळ या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल, अशी सूचना महिला व बालकल्याण खात्याने दिली आहे.
