पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या नेतृत्वाखालील आंदेकर टोळीच्या मुस्क्या आवळ्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली असून बेकायदेशीर कमान पाडल्यानंतर आता पोलिसांना अजून एक मोठं यश आलं आहे. या टोळीच्या चार वसुलीखोरांना फरासखाना पोलिसांकडून बेड्या घालण्यात आल्या आहेत. तसेच आता या प्रकरणामध्ये पोलीस थेट इन्कम टॅक्स विभागाची मदत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्या चौघांना अटक
गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासे व्यापाऱ्यांकडून 12 वर्षांहून खंडणी वसूल करणाऱ्या बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकर टोळीसाठी काम करणाऱ्या चार वसुलीखोरांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये शेखर अंकुश, सागर थोपटे, रोहित बहादुरकर आणि मनिष वर्धेकर यांचा समावेश आहे. आंदेकर टोळीच्या चौकशीत कोट्यवधींची मालमत्ता सापडली असून, त्यांनी एकदाही इन्कम टॅक्स भरलेला नाही. तर दुसरीकडे अन्य आरोपींची मालमताही पोलिसांच्या रडारवर आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या अवैध मालमत्तेवर ही अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार आहे. गणेश कुमकर, सोमनाथ गायकवाड या टोळीशी संबंधित सर्वांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
थेट इन्कमटॅक्स डिपार्टमेंटकडून घेणार माहिती
केवळ खंडणीखोरांना अटकच नाही तर नेमकी ही खंडणी कितीची वसूल करण्यात आली त्याचा काही रेकॉर्ड आहे का हे तपासण्यासही पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंदेकर टोळीच्या संपत्तीच्या चौकशीसाठी पोलीस प्राप्तिकर विभागाशी पत्रव्यवहार करणार आहेत. टोळी प्रमुख बंडू आंदेकर यांच्यासह 11 जणाविरोधात मासे विक्रेत्याकडून 20 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये ही खंडणी उकळण्यात आल्याने त्यांची स्थावर मालमत्ता किती याची चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. या टोळीने कोणत्या मार्गाने माया जमवली, मालमत्तेची संबंधित किती व्यवहार वैध आहेत. किती काळ्या पैशातून हे सम्राज्य उभे राहिले याची माहिती घेण्यासाठी पत्र पाठवलं जाणार आहे.
आंदेकर टोळीने केलेलं ते बांधकाम पाडलं
पुण्याच्या नानापेठेतील आंदेकर टोळीच्या साम्राज्याची निशाणी असलेली वनराज आंदेकरची अवैध कमान पालिकेनं पोलिसांच्या सूचनेनुसार मंगळवारी क्रेनच्या मदतीने उखडून टाकली. या भागातल्या नागरिकांनी भयमुक्तीचा एका दिर्घ मोकळा श्वास घेतल्याचं बघायला मिळालं. कालपासून समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उमेश गित्ते यांच्या नेतृत्वात ही धडक हातोडा कारवाई सुरू होती. नागरिकांनी कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मात्र याच नागरिकांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मागील 10 वर्षांपासून आंदेकर टोळीची दहशत होती हे त्यांनी दिलेल्या खंडणीच्या रक्कमेवरुन स्पष्ट होत आहे. आंदेकर टोळी पुण्यातील नानापेठ परिसरातील गुंडांची टोळी आहे. टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय 70) असून, त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि साथीदारांचा यात सहभाग आहे. कृष्णा आंदेकर हा बंडूचा मुलगा असूनच तो आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणातील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे.
