मेंदू खाणा-या अमिबामुळे भारतात 19 जणांचा बळी

तुम्ही रोज तळ्यात, विहीरीत किंवा स्विमिंग पूलमध्ये पोहत असाल तर सावधान. विहीरी, तळं आणि स्विमिंगपूलमध्ये पोहणं तुम्हाला थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतं. कारण बंदीस्त असलेल्या पाण्यात मेंदू खाणारा अमिबा आलाय. या अमिबामुळं अवघ्या नऊ ते दहा दिवसांत माणूस मृत्यूच्या दारात जातोय. या आजारावर कोणतेही उपचार नसून केरळमध्ये मेंदू खाणा-या अमिबानं 19 जणांचा बळी घेतलाय. त्यामुळं पाण्यात पाय टाकताना शंभर वेळ विचार करा.

पाण्यात पोहणं न आवडणारे काही मोजकेच लोक आहेत. पोहता येवो न येवो पण पाण्यात डुबकी मारायला अनेकांना आवडतं. तुम्हालाही पाण्यात पोहण्याची किंवा डुंबण्याची हौस असेल तर ही हौस पुरी करण्याआधी ही बातमी वाचा.  पाण्यात पोहण्याच्या आनंदाच्या मोहात तुम्हाला जीव गमवावा लागू शकतो. कारण पाण्यात लपून बसलाय एक धोकादायक आणि न दिसणारा शत्रू…. हा नवा शत्रू आहे मेंदू खाणारा अमिबा…. हो मेंदू खाणारा अमिबा… तुम्ही आम्ही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात अमिबा या एकपेशीय जीव असतो हे आपण वाचलं होतं. पण हाच अमिबा कधीतरी आपल्या जीवावर उठेल याची कधी कल्पनाही केली नसेल… मेंदू खाणारा अमिबा म्हणजे ब्रेन ईटिंग अमिबाचा भारतात प्रादुर्भाव झालाय. या अमिबामुळं तब्बल 19 भारतीयांना जीव गमवावा लागलाय. भारतातल्या केरळ राज्यात ब्रेन ईटिंग अमिबाचे रुग्ण आढळून आलेत.  कोरोनाप्रमाणं हा ब्रेन ईटिंग अमिबा देशातील इतर राज्यात पसरण्याची भीती व्यक्त केली जातेय. ब्रेन इटिंग अमिबाचा प्रादुर्भाव झाल्यास माणूस वाचण्याची शक्यता अवघी 3 टक्के उरते. त्यामुळं हा आजार किती भयानक आहे याची कल्पना येते

 

कशी होते ब्रेन इटिंग अमिबाची लागण? 

नाग्लेरिया फाऊलेरी हा या घातक अमिबाचा प्रकार
ब्रेन इटिंग अमिबा उष्ण, साचलेल्या पाण्यात वाढतो
शुद्ध न केलेल्या पाण्यात अमिबा वेगाने वाढतो
पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या नाकावाटे शरीरात प्रवेश करतो
नाकातून थेट हा अमिबा मेंदूपर्यंत पोहोचतो
मेंदूला अमिबा गंभीर इजा करतो
योग्य उपचार न मिळाल्यास काही दिवसातच माणसाचा मृत्यू होतो

ब्रेन इटिंग अमिबाच्या प्रादुर्भावाचं कारण साचलेलं पाणी आहे. त्यामुळं तलाव आणि सरोवरं, साफ न केलेले स्विमिंगपूल अशी ठिकाणं मेंदू खाणा-या अमिबाची वसतिस्थानं असण्याची शक्यता आहे. नियमित पोहणा-या केरळमधील अनेक व्यक्तींना या आजाराची लागण झाली आहे.  ब्रेन इटिंग अमिबाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये काही लक्षणं लगेचच दिसून येतात. ब्रेन इटिंग अमिबाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये खालील लक्षणे दिसतात.

ब्रेन इटिंग अमिबाची लक्षणं

तीव्र डोकेदुखी
ताप येणे
उलट्या होणे
मान आखडणे
फिट्स येणे

अशी लक्षणं आढळतात… हा आजार अतिशय गंभीर असला तरी एक थोडासा दिलासादायक बाब म्हणजे हा आजार माणसांपासून इतर माणसांना होत नाही. केरळमध्ये या मेंदू खाणा-या अमिबाची तब्बल 70 प्रकरणं आढळलीयेत. यातल्या 19 जणांचा मृत्यू झालाय. केरळच्या तीन ते चार जिल्ह्यात या ब्रेन इटिंग अमिबाचे रुग्ण आढळून आलेत. केरळची संपूर्ण आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर गेली आहे.

केरळ हे पर्यटन राज्य आहे. तिथं दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पर्यटक येतात. या पर्यटकांच्या माध्यमातून ब्रेन इटिंग अमिबा देशभर पसरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून केरळमध्ये जाणा-या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं महाराष्ट्रासाठीही हा धोका आहेच. मेंदू खाणारा अमिबा होऊ नये म्हणून काही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

काय काळजी घ्यावी

अस्वच्छ पाणी असलेल्या तळ्यात, विहिरीत अंघोळ करू नये
स्विमिंग पूल क्लोरिनेट असेल तरच अंघोळीला उतरावं
नाक स्वच्छ करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा
घरगुती पाणी पिण्याच्या टाक्या नियमीत स्वच्छ कराव्या
पिण्याचं पाणी साठवताना ते झाकून ठेवावं
अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्यात.

जेवढा मृत्यूदर अधिक तेवढा आजार भयानक असं मानलं जात. ब्रेन इटिंग अमिबा आजार झाल्यावर रुग्ण वाचण्याची शक्यता अगदीच कमी आहे यातच या आजाराचं गांभीर्य लक्षात येतंय. मेंदू खाणा-या अमिबापासून वाचायचं असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. काळजी घेणे हाच सगळ्यात मोठा उपाय असणार आहे. त्यामुळं राहा खबरदार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *