सर्वोच्च न्यायालयात कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी अर्थात माधुरी हत्तीणीबाबत शुक्रवारी सुनावणी पार पडली. या महत्त्वाच्या सुनावणीत महादेवीला पुन्हा नांदणी मठात आणण्याच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवला असून, सोमवारी मठाकडून अर्ज सादर झाल्यानंतर हत्तीण परत येण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे. या निकालामुळे स्थानिक नागरिकांचा निर्धार व आंदोलनाला यश मिळाल्याचेही दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सरकारचे वकील ॲड. धर्माधिकारी यांनी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या मागील आदेशानुसार वनतारा येथे हलवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या काळात कायद्याच्या आणि सुव्यवस्थेच्या अडचणींची जाणीव होताच सरकारने कोल्हापूरच्या नांदणी मठाशी चर्चेतून उपाय शोधल्याचे सांगितले. त्याच अनुषंगाने, नांदणीच्या जागेवर वनताराच्या देखरेखीखाली आधुनिक हत्ती पुनर्वसन केंद्र उभारले जाईल, तिथेच माधुरी हत्तीवर उपचार सुरू राहतील, असे त्यांनी मांडले.
